ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात अभिनेता विल स्मिथने (Will Smith) निवेदक क्रिस रॉकच्या (Chris Rock) कानाखाली मारल्याच्या घटनेचे पडसाद जगभरात उमटले. निवेदकाने विलच्या पत्नीची मस्करी केल्याने संतप्त झालेल्या विल स्मिथने मंचावर जाऊन त्याच्या कानशिलात लगावली. विलची पत्नी जाडा स्मिथ हिच्या टकलेवरून क्रिसने मस्करी केली होती. मात्र जाडा अलोपेसिया (alopecia areata) नावाच्या आजाराचा सामना करत असून त्यामुळे तिला टक्कल पडलंय. पत्नीच्या आजारावरून केलेली मस्करी विलला सहन झाली नाही आणि म्हणूनच त्याने मंचावर जाऊन त्याच्या कानशिलात लगावली. काहींनी या घटनेचं समर्थन केलं तर काहींनी विलच्या वागणुकीवर आक्षेप घेतला. या सर्वांत अॅलोपेसियाने ग्रस्त असलेले अनेकजण त्यांच्या प्रवासाबद्दल व्यक्त होत आहेत. त्याबद्दल चेष्टा-मस्करी करणं खरंच योग्य आहे का, याविषयी ते सोशल मीडियावर मतं मांडत आहेत. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डीचाही (Sameera Reddy) समावेश आहे. समीराने इन्स्टाग्रामवर याविषयी भलीमोठी पोस्ट लिहिली आहे.
या ऑटो- इम्युन आजाराबद्दल समीराने लिहिलं, ‘अलोपेसिया एरियाटामध्ये तुमच्या रोगप्रतिकारक प्रणालीतील पेशी तुमच्या केसांच्या फॉलिकल्सवर हल्ला करतात. यामुळे केस गळून त्याठिकाणी टक्कल पडतं. 2016 मध्ये मला या आजाराचं निदान झालं. त्यावेळी अक्षयने माझ्या डोक्याच्या मागील बाजूस दोन इंच टक्कल पडल्याचं पाहिलं होतं. त्यानंतर महिनाभरात डोक्यावर आणखी दोन ठिकाणी टक्कल पडलं. त्याला सामोरं जाणं खरंच कठीण होतं. हा आजार काही संसर्गजन्य नाही किंवा त्यामुळे लोक आजारी पडत नाहीत. मात्र भावनिकदृष्ट्या त्या गोष्टींना सामोरं जाणं कठीण असतं.’
‘बर्याच लोकांसाठी अॅलोपेसिया एरियाटा हा एक अत्यंत क्लेशकारक आजार आहे. डॉक्टरांनी मला सांगितलं की बहुतांश प्रकरणांमध्ये टक्कल पडलेल्या ठिकाणी केस परत वाढू शकतात आणि त्यासाठी टाळूवर कॉर्टिकोस्टेरॉईड्सचे इंजेक्शन द्यावे लागतात. माझ्या डोक्यावरील त्या तीन पॅचेसच्या ठिकाणी हळूहळू केस वाढू लागले आहेत. पण मला याची जाणीव आहे की यावर कोणताही इलाज नाही,’ असंही तिने पुढे म्हटलंय.
जरी केस वाढू लागले असले तरी पुन्हा तशा प्रकारचं टक्कल केव्हाही पडू शकतं, असं डॉक्टरांनी समीराला सांगितलंय. त्यामुळे आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांनी थोडा वेळ थांबून आत्मचिंतन करावं आणि एकमेकांसोबत संवेदनशीलपणे वागावं, अशी विनंती तिने केली आहे.
हेही वाचा:
जॅकी श्रॉफ यांच्या मनाची श्रीमंती; निधनाचं वृत्त समजताच घरगड्याच्या घरी सांत्वनाला पोहोचले