एस. एस. राजामौली यांचा RRR असो किंवा मग यशची मुख्य भूमिका असलेला ‘केजीएफ: चाप्टर 2’.. गेल्या काही दिवसांत दाक्षिणात्य चित्रपटांनी हिंदी चित्रपटांचंही मार्केट आपल्या नावे केल्याची जोरदार चर्चा होत आहे. हे दोन्ही दाक्षिणात्य चित्रपट हिंदीसह विविध भाषांमध्ये प्रदर्शित झाले. या चित्रपटांच्या हिंदी व्हर्जननेही बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. सध्या ‘केजीएफ 2’ (KGF: Chapter 2) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. यामध्ये बॉलिवूड अभिनेता संजय दत्तनेही (Sanjay Dutt) भूमिका साकारली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत संजूबाबाने हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील (South Film Industry) फरक समजावून सांगितला. हिंदी चित्रपटांचं नेमकं कुठे चुकतंय, याविषयी त्याने सविस्तर प्रतिक्रिया दिली.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत संजय दत्त म्हणाला, “मला असं वाटतं की हिंदी फिल्म इंडस्ट्री ही आता लार्जर दॅन लाइफ हिरोइझ्मला विसरली आहे. मात्र दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी या गोष्टीला विसरली नाही. रॉम-कॉम किंवा हलकेफुलके चित्रपट वाईट असतात असं मला म्हणायचं नाही. पण आपण उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, झारखंड इथल्या प्रेक्षकांना का विसरलो? यापूर्वी आपल्याकडे वैयक्तिक निर्माते आणि फायनान्सर होते, ज्यांना फिल्म स्टुडिओच्या कॉर्पोरेटायझेशनने संपुष्टात आणलंय. कॉर्पोरेटायझेशन चांगलं आहे पण त्यामुळे चित्रपटांच्या आवडीनिवडींमध्ये अडथळा येऊ नये.”
“उदाहरण द्यायचे झाल्यास, एस. एस. राजामौली यांचे निर्माते ठरलेले असतात, जे त्यांच्या कामावर पूर्ण विश्वास ठेवतात. आपल्याकडे असे निर्माते आधी होते. गुल्शन राय, यश चोप्रा, सुभाष घई आणि यश जोहर हे त्यापैकीच आहेत. त्यांनी बनवलेल्या चित्रपटांकडे पहा. दक्षिणेत ते कागदावरील स्क्रिप्ट पाहतात आणि इथं कागदावर रिकव्हरीचे आकडे पाहिले जातात”, असं तो पुढे म्हणाला.
राजामौली यांच्या RRR या चित्रपटाने जगभरात तब्बल 1000 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर दुसरीकडे ‘KGF 2’ने आतापर्यंत जगभरात कमाईचा 500 कोटींचा आकडा पार केला आहे. या आकड्यांवरूनच दाक्षिणात्य चित्रपटांचा प्रेक्षकांवरील प्रभाव पहायला मिळतोय. अभिनेता संजय दत्त लवकरच ‘पृथ्वीराज’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत अक्षय कुमार, मानुषी छिल्लर, साक्षी तंवर आणि सोनू सूद यांच्या भूमिका आहेत. त्याचा ‘शमशेरा’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे.
हेही वाचा: