नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेते सतिश कौशिक यांचं निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने सतिश कौशिक यांचा मृत्यू झाला असावा असं सांगितलं जात आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्येही कार्डियाक अरेस्टमुळे कौशिक यांचा मृत्यू झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. मात्र, दिल्ली पोलिसांना याबाबत वेगळाच संशय येत आहे. सतिश कौशिक यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला की आणखी काही कारणामुळे याचा दिल्ली पोलीस शोध घेत आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.
साऊथ वेस्ट दिल्ली येथील फार्म हाऊसमध्ये होळीची पार्टी होती. याच होळीच्या पार्टीत सतिश कौशिकही सहभागी झाले होते. पोलिसांनी या फार्म हाऊसचा कसून तपास केला आहे. या तपासात पोलिसांना काही औषधे सापडली आहे. यात डायजीन आणि शुगरची नियमित औषधेही आहेत. त्याशिवाय इतरही काही औषधे सापडली आहेत. ही औषधे कोणती आहेत? ती आजारांवरचीच आहेत का? याचा शोध पोलीस घेत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणात काहीच संशयास्पद नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. अधिक चौकशीसाठी रक्त आणि हृदय बाजूला ठेवण्यात आलं आहे. आठ पंधरा दिवसात रक्त आणि हृदयाच्या रिपोर्टचा अहवाल मिळणार आहे. कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी पोलीस डिटेल पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत. हा रिपोर्ट आल्यानंतरच कौशिक यांच्या मृत्यूचं नेमकं कारण कळणार आहे. त्याशिवाय पोलिसांनी होळीच्या पार्टीतील गेस्टची यादीही मागवली आहे.
मृत्यूच्या दोन दिवस आधी सतिश कौशिक मनसोक्तपणे होळी खेळले. त्यांच्या आयुष्यातील ही शेवटची धुळवड असले असं त्यांना वाटलंही नसेल. त्यांनी 7 मार्च रोजी जावेद अख्तर यांच्या मुंबईतील घरी होळीची पार्टी एन्जॉय केली होती. यावेळी सर्वच कलाकारांशी त्यांनी होळी खेळत मनसोक्त गप्पाही मारल्या होत्या. त्यानंतर ते 8 मार्च रोजी होळी खेळण्यासाठी दिल्लीत आले होते.
दिल्लीतील बिजवासन येथील फॉर्महाऊसवर ते कुटुंबासह होळी खेळायला आले होते. 8 मार्च रोजीही त्यांनी होळीचा प्रचंड आनंद लुटला. त्यानंतर रात्री 12 वाजून 10 मिनिटांनी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांनी आपल्या मॅनेजरला बोलावलं आणि त्रास होत असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांना तात्काळ फोर्टीस रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथे जाण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.