मुंबई : बाॅलिवूडचा किंग खान अर्थात आपल्या सर्वांचा आवडता अभिनेता शाहरुख खानचा आज 57 वा वाढदिवस आहे. जगभरातून शाहरुख खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. इतकेच नाही तर शाहरुख खानला शुभेच्छा देण्यासाठी चाहते मुंबईमध्ये दाखल झाले असून मन्नत बंगल्याबाहेर गर्दी करत आहेत. रात्री 12 च्या अगोदरच चाहत्यांनी गाणी म्हणत डान्स करत शाहरुख खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये शाहरुखसोबत दीपिका पादुकोण देखील दिसत आहे. काल रात्री शाहरुख खानच्या मन्नत बाहेर चाहते मोठ्या प्रमाणात जमले होते. विशेष म्हणजे शाहरुखही बाहेर चाहत्यांना भेटण्यासाठी आला होता.
आपल्या आवडत्या अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी हजारो लोक त्याच्या घराबाहेर पोहचले होते. मध्यरात्री चाहत्यांना भेटण्यासाठी शाहरुख मन्नतच्या टेरेसवर आला, त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
शाहरुख खानसोबत त्याचा मुलगा अबरामही होता. किंग खानने हात जोडून चाहत्यांचे आभार मानले. यावेळी शाहरुख खानने अबरामला उचलून घेतले होते. शाहरुख आणि अबरामला पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.
यावेळी शाहरुख खानचा लूकही पाहण्यासारखा होता. निळ्या रंगाच्या टी-शर्टसह जीन्समध्ये शाहरुख दिसला. बाॅलिवूडमधील अनेक अभिनेत्यांनी शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.