‘बिगिल’, ‘मर्सल’ यांसारख्या सुपरहिट दाक्षिणात्य चित्रपटांचा दिग्दर्शक अटली (Atlee) आता बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन करतोय. ‘जवान’ (Jawan) असं या चित्रपटाचं नाव असून त्याचा पोस्टर काही दिवसांपूर्वी शाहरुखने लाँच केला होता. यामध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा शाहरुखसोबत मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच सर्वांत मोठी डील झाल्याची माहिती समोर येत आहे. शाहरुखच्या ‘जवान’ या चित्रपटाचे डिजिटल स्ट्रिमिंगचे हक्क ‘नेटफ्लिक्स’ (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मला विकलं गेल्याचं कळतंय. इतकंच नव्हे तर यासाठी त्याला खूप मोठी रक्कमही मिळाल्याचं म्हटलं जातंय. ‘बॉलिवूड लाइफ’ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
नेटफ्लिक्सने तब्बल 120 कोटी रुपयांना ‘जवान’चे हक्क विकत घेतले आहेत. याविषयी अद्याप निर्मात्यांनी कोणती माहिती दिली नाही. काही दिवसांपूर्वी शाहरुखने इन्स्टाग्राम लाईव्हद्वारे चाहत्यांशी गप्पा मारल्या होत्या. यावेळी तो या चित्रपटाविषयी व्यक्त झाला. “अजून बरंच काही काम बाकी आहे. जवान या चित्रपटाविषयी मी आता तुम्हाला फार काही सांगू शकणार नाही. पण एक अभिनेता म्हणून मला काम करताना खूप मजा येतेय. अटलीचं काम प्रत्येकाने पाहिलं आहे. आतापर्यंत मी अशा जॉनरमध्ये काम केलं नव्हतं. त्यामुळे माझ्यासाठी हा पूर्ण एक वेगळा अनुभव आहे,” असं तो म्हणाला.
‘जवान’ हा चित्रपट 2 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय शाहरुख खान ‘पठाण’ या चित्रपटातही मुख्य भूमिका साकारणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या भूमिका आहेत. शाहरुखने काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा ‘डंकी’ हा चित्रपट साईन केला. यामध्ये तापसी पन्नूची मुख्य भूमिका असेल.