अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि त्याची पत्नी मीरा राजपूत (Mira Rajput) यांनी नुकताच नव्या घरात गृहप्रवेश केला. शाहिदने वरळीत (Worli) हे नवीन घर घेतलंय. याआधी हे दोघं जुहूमध्ये राहायचे. 2018 मध्ये शाहिदने घर खरेदी केलं होतं. वर्षभराने 2019 मध्ये त्याला या घराचा ताबा मिळाला. मात्र कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे त्यांना घराचं इंटेरिअर डिझायनिंग करण्यासाठी बराच वेळ लागला. अखेर चार वर्षांनंतर त्यांनी या स्वप्नांच्या घरात प्रवेश केला आहे.
पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, या ड्युप्लेक्सची किंमत तब्बल 58 कोटी इतकी आहे. त्यात खास सहा पार्किंग स्लॉट देण्यात आले आहेत. शाहिद आणि मीरा त्यांच्या दोन मुलांसोबत वरळीतल्या या पॉश सी-फेसिंग घरात राहायला गेले. त्यापूर्वी त्यांनी गृहप्रवेशाची पूजासुद्धा केली. वांद्रे-वरळी सी-लिंकजवळ ‘360 वेस्ट’ ही बहुमजली इमारत आहे. या इमारतीच्या 42 आणि 43 व्या मजल्यावर शाहिदचं ड्युप्लेक्स अपार्टमेंट आहे.
शाहिदला आलिशान कार आणि बाईक्सची खूप आवड आहे. त्यामुळेच या नवीन घरात खास सहा पार्किंग स्लॉट देण्यात आले आहेत. इतकंच नव्हे तर या घराला 500 स्क्वेअर फूटची बाल्कनी आहे. समुद्राच्या देखाव्याचा आनंद घेता यावा यासाठी खास पद्धतीने शाहिद आणि मीराने ही बाल्कनी डिझाइन केली आहे. शाहिदचं हे नवीन घर तब्बल 8625 स्क्वेअर फूटचं आहे. या घरातून सी-लिंकचा सुंदर देखावा पहायला मिळतो.
7 जुलै 2022 रोजी शाहिद-मीराच्या लग्नाला सात वर्षे पूर्ण झाली. या दोघांनी मिशा ही मुलगी आणि झैन हा मुलगा आहे. ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत शाहिद म्हणाला होता, “मिशा आणि झैनच्या जन्मानंतर आमचं जुनं घर आम्हाला छोटं वाटू लागलं. आम्हाला ती जागा लहान वाटल्याने मुलांसाठी नवीन घर घेण्याचा विचार केला. सी-लिंकजवळचा अपार्टमेंट मी जेव्हा पाहिला, तेव्हा मला तो खूपच आवडला होता.”