अभिनेत्री श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) भाऊ सिद्धांत कपूरला (Siddhanth Kapoor) बेंगळुरू पोलिसांनी एका रेव्ह पार्टीतून ताब्यात घेतलं. सिद्धांतवर ड्रग्जचं सेवन (drug use) केल्याचा आरोप आहे. बेंगळुरूमधल्या एका पंचतारांकित हॉटेलवर पोलिसांनी रविवारी रात्री धाड टाकली होती. यावेळी त्यांनी 35 जणांना ताब्यात घेतलं. या सर्वांची ड्रग्ज टेस्ट केल्यानंतर त्यापैकी 6 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आणि या सहा जणांमध्ये सिद्धांतचाही समावेश आहे. याप्रकरणी तपास सुरू आहे. सिद्धांतचे वडील आणि अभिनेते शक्ती कपूर यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. ‘हे शक्य नाही’, असं ते म्हणाले. श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री असली तरी तिचा भाऊ सिद्धांत कपूर फारसा कधी चर्चेत राहिला नाही. सिद्धार्थसुद्धा बॉलिवूडमध्येच काम करत असून त्याने अनेक चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.
सिद्धांतसुद्धा बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून काम करत आहे. त्याने काही चित्रपट आणि वेब शोमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सिद्धांत हा डीजेसुद्धा आहे.
सिद्धांत हा शक्ती कपूर आणि शिवांग कपूर यांचा मोठा मुलगा आहे. तर अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आहे. त्याचे इतरही काही कुटुंब सदस्य आहेत जे मनोरंजन इंडस्ट्रीत काम करतात. दिग्गज गायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले या सिद्धांतच्या आजी आहेत. तर पद्मिनी कोल्हापुरे आणि तेजस्विनी कोल्हापुरे या त्याच्या मावश्या आहेत.
2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भागम भाग’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. ‘चुप चुपके’, ‘भुल भुलैय्या’, ‘ढोल’ यांसारख्या चित्रपटांसाठीही त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. अभिनेता म्हणून त्याने 2013 मध्ये ‘शूटआऊट अॅट वडाला’ या चित्रपटातून पदार्पण केलं. याशिवाय त्याने जजबा, पलटन, बोंबारियाँ, यारम, हॅलो चार्ली, भूत यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अग्ली’ या चित्रपटासाठी त्याने अनुराग कश्यपसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. यामध्ये त्याने छोटीशी भूमिकासुद्धा साकारली होती. 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भौकाल’ या वेब सीरिजमध्ये त्याने भूमिका साकारली होती. ‘भौकाल 2’मध्येही तो चिंटूची भूमिका साकारणार आहे. तर अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांच्या ‘चेहरे’मध्येही तो झळकला होता.
सिद्धार्थने ‘बाजी पोकर टूर गोवा’ आणि ‘नॅशनल पोकर सीरिज’मध्येही भाग घेतला होता. त्याने गायनात प्रशिक्षण घेतलं असून ‘हम हिंदुस्तानी’ हे गाणं त्याने गायलं आहे.