ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) भाऊ सिद्धांत कपूरला (Siddhanth Kapoor) जामीन मिळाला आहे. बेंगळुरूमधील एका पंचतारांकित हॉटेलमधून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. या हॉटेलमध्ये ड्रग्जचं (drugs) सेवन केलं जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी त्या हॉटेलवर धाड टाकली. यावेळी एकूण 34 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्या सर्वांची ड्रग्ज टेस्ट केली असता सहा जणांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले होते. या सहा जणांमध्ये सिद्धांतचाही समावेश होता. सिद्धांतसोबत इतरांनाही जामीन मिळाला आहे. मात्र पोलिसांनी चौकशीला बोलावल्यास त्यांना तिथे हजर राहावं लागेल, अशी माहिती बेंगळुरूचे डीसीपी भीमाशंकर यांनी दिली.
“सिद्धांत कपूरने ड्रग्जचं सेवन केलं होतं, असं रिपोर्टमध्ये आढळून आलं. आम्ही त्याला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवू”, असंही पोलीस म्हणाले. “आम्हाला हॉटेलमध्ये होत असलेल्या पार्टीबाबत माहिती मिळाली होती. त्या हॉटेलमध्ये धाड टाकून आम्ही 34 लोकांना ताब्यात घेतलं होतं. आम्हाला त्याठिकाणी कोणतेही ड्रग्ज मिळाले नाहीत, पण MDMA आणि गांजा हे वापरून फेकून दिल्याचं तिथे जवळच आढळलं. आम्ही सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करू”, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Actor Shraddha Kapoor’s brother Siddhanth Kapoor and four others have been released on station bail. They will further have to appear before the Police as and when called: Bheema Shankar Gulled, DCP East Bengaluru
— ANI (@ANI) June 13, 2022
याप्रकरणी शक्ती कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी सध्या फक्त एकच गोष्ट बोलू शकतो की हे शक्य नाही. मी सध्या मुंबईत आहे आणि तिथे काय घडतंय याची मला काहीच कल्पना नाही. मला फक्त वृत्तवाहिन्यांमधूनच माहिती मिळतेय. माझ्या मते कोणतीही अटक झालेली नाही आणि सिद्धार्थला फक्त ताब्यात घेतलंय,” असं ते म्हणाले. सिद्धांत हा रविवारी मुंबईहून बेंगळुरूला गेला होता. रविवारी रात्री उशिरा झालेल्या पार्टीदरम्यान ही घटना घडली. सिद्धांत कोणत्या हॉटेलमध्ये थांबला होता, याबद्दलची माहिती कपूर कुटुंबीयांना नव्हती.
सिद्धांतसुद्धा बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून काम करत आहे. त्याने काही चित्रपट आणि वेब शोमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सिद्धांत हा डीजेसुद्धा आहे. 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भागम भाग’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. ‘चुप चुपके’, ‘भुल भुलैय्या’, ‘ढोल’ यांसारख्या चित्रपटांसाठीही त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. अभिनेता म्हणून त्याने 2013 मध्ये ‘शूटआऊट ॲट वडाला’ या चित्रपटातून पदार्पण केलं.