आयेशा सय्यद, मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांचं मुंबईमधल्या जुहूतील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये (Criti Care Hospital) निधन झालं. बप्पी लाहिरी यांनी 69 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या जाण्यानंतर आता संगीत क्षेत्राला आज पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. बप्पी दा यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिट गाणी दिली. या गाण्यांनी श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला तो आजतागायत. बप्पी दा हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या गायकांपैकी एक होते. त्यामुळे त्यांची संपत्ती अधिक आहे. आज आपण बप्पी एका गाण्यासाठी किती पैसे घ्यायचे, त्यांची संपत्ती (Bappi Lahiri Wealth) किती आहे, याविषयी जाणून घेणार आहोत.
caknowledgeच्या रिपोर्टनुसार, बप्पी दा यांच्याकडे आलिशान गाड्यांचा संग्रह होता. त्याच्याकडे BMW, Audi यासारख्या 5 कार होत्या. याशिवाय त्याच्याकडे टेस्ला X देखील होती, ज्याची किंमत 55 लाख आहे. बप्पी दा यांची एकूण संपत्ती 20 कोटी आहे.
उत्पन्नाचा मार्ग
बप्पी दा यांनी आपल्या गायकीतून कमाई केली. रिअॅलिटी शोजचे जज म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. शिवाय लाइव्ह परफॉर्मन्सच्या माध्यमातून त्यांनी कमाई केली. ते संगीतकारही होते. त्यांनी अभिनयही केला आहे ज्यातून त्यांनी चांगली कमाई केली.
‘गोल्डन’ गायक
बाप्पी लाहिरी यांच्याकडे भरपूर सोनं होतं. त्यांना सोनं प्रचंड आवडायचं. त्यामुळे त्यांनी परिधान केलेलं सोनं चर्चेचा विषय असायचा. बरेचदा लोक त्यांना त्यांच्या स्टाईलबद्दल प्रश्न विचारायचे, तेव्हा ते म्हणायचे की, “मला सोन्याचे दागिने घालायला आवडतात.” एवढंच नाही तर कधी-कधी ते कुणाच्या कामाने प्रभावित झाले तर त्यांचे दागिने त्या व्यक्तीला भेट म्हणून द्यायचे. 2014 मध्ये दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार बप्पीकडे सुमारे 754 ग्रॅम सोने 4.62 किलो चांदी होते. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेला तपशील 2014 मधील आहे. त्या गोष्टीला जवळपास 7 वर्षे झाली आहेत.
बप्पी दा इतके सोने का घालतात?
बप्पी दा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, “मी अमेरिकन पॉपस्टार एल्विस प्रेस्लीपासून खूप प्रभावित होतो. पॉपस्टार एल्विस प्रेस्लीने त्याच्या कॉन्सर्टमध्ये सोन्याची चेन घातली होती. एल्विस प्रेस्लीला पाहिल्यानंतर मला वाटायचे की, जेव्हा मी एक यशस्वी व्यक्ती बनेन, तेव्हा मी स्वत:ची वेगळी प्रतिमा तयार करेन. प्रेस्लीपासून प्रेरित होऊन, मी सोनेरी परिधान करतो आणि ते माझ्यासाठी भाग्यवान आहे.”
संबंधित बातम्या