बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक कुष्णकुमार कुन्नथ उर्फ केके (KK) यांच्या मृत्यूच्या संबंधात कोलकाता पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. बुधवारी शवविच्छेदन केल्यानंतर अहवालात केके यांचा मृत्यू हृदयविकारानेच झाल्याचं सिद्ध झालं. केके हे दोन दिवसांच्या कोलकाता दौऱ्यावर गेले होते. दोन महाविद्यालयांमध्ये त्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मंगळवारी कार्यक्रमादरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. हॉटेलवर परतल्यानंतर त्यांना त्रास झाला आणि रुग्णालयात दाखल केलं असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं. कार्यक्रमाच्या ठिकाणाच्या व्यवस्थापनावरूनही विविध प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र केके यांना दीर्घकाळापासून हृदयासंबंधी समस्या (cardiac issues) होत्या, असं त्यांच्या शवविच्छेदन अहवालात (autopsy report) नमून करण्यात आलं आहे. त्यांच्या हृदयाच्या स्नायूंमध्ये रक्ताची गुठळी झाली होती. त्यांच्या मृत्यूमागे कोणताही घातपात नव्हता, असं पोर्टमॉर्टम रिपोर्टमध्ये दिसून आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
हॉलमध्ये 2700 प्रेक्षकांची क्षमता असताना प्रत्यक्षात त्याठिकाणी 7000 लोक उपस्थित होते. अशा वेळी प्रशासनाकडून लक्ष का दिलं गेलं नाही, असे प्रश्न नेटकऱ्यांकडून आणि विरोधकांकडून उपस्थित करण्यात आले. ममता बॅनर्जी यांच्या सरकारवरही निशाणा साधला गेला. भाजपने निष्पक्ष चौकशीची मागणी केली, तर तृणमूलने मृत्यूचं राजकारण करू नये असं आवाहन केलं.
Maharashtra | Mortal remains of singer Krishnakumar Kunnath popularly known as #KK brought to his residence in Mumbai
The last rites of the singer will be performed in Mumbai today. pic.twitter.com/AL72BfoeUz
— ANI (@ANI) June 2, 2022
दरम्यान, पश्चिम बंगाल पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून केके यांना अखेरची सलामी दिली. काही वेळ कोलकातामधील रवींद्र सदन याठिकाणी त्यांचं पार्थिव ठेवल्यानंतर ते मुंबईला नेण्यात आलं. आज (गुरुवार) मुंबईत केके यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.