ही अनोखी गाठ बांधली; खामोश! सोनाक्षी-झहीर यांच्या लग्नाला वडिलांचा विरोध म्हणणाऱ्यांना तिने फोटोतून दिलं उत्तर
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाला सोनाक्षीच्या वडिलांचा विरोध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. विशेष म्हणजे अशाप्रकारच्या चर्चा घडवून सोनाक्षीला ट्रोलदेखील करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण अशा चर्चा घडवून आणणाऱ्यांना सोनाक्षीने फोटोंमधून उत्तर दिलं आहे. सोनाक्षी आणि झहीर आज अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. दोघांनी कोर्ट मॅरेज केलंय. झहिरच्या घरी हा कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे नवरदेव-नवरी या दोघांच्या स्वाक्षरीवेळी नवरीचे वडील म्हणजेच सोनाक्षीचे वडील हे त्यांच्या बाजूलाच उभे होते. सोनाक्षीने आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिच्या आयुष्यातील सर्वात सुवर्ण क्षणांचे सुंदर चित्र टिपण्यात आल्याचं बघायला मिळत आहे. सोनाक्षीने या फोटोंना खूप सुंदर कॅप्शन देत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.