बॉलिवूड इंडस्ट्री (Bollywood) आणि अंडरवर्ल्डमधील (Underworld) संबंध अनेकदा चर्चेत आले आहेत. अंडरवर्ल्ड जगाशी संबंधित लोक पडद्याआड राहून बॉलिवूडवर वर्चस्व गाजवतात असं म्हटलं जातं. 90 च्या दशकात अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्यांचा हस्तक्षेप चित्रपट जगतात सर्वाधिक होता. आता बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) या मुद्द्यावर उघडपणे बोलली आहे. चित्रपटांवर अंडरवर्ल्डचा प्रभाव असल्यामुळेच तिला अनेक चित्रपट सोडावे लागले, असा दावा सोनालीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. सोनालीने असंही सांगितलं की अंडरवर्ल्डसाठी बॉलिवूड हे सोपं लक्ष्य आहे.
अलीकडेच सोनाली बेंद्रेने एक मुलाखत दिली आहे, ज्यामध्ये तिने बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डच्या मुद्द्यावर खुलेपणानं भाष्य केलं आहे. या मुलाखतीत सोनाली म्हणाली, “90 च्या दशकात दिग्दर्शक आणि निर्माते अंडरवर्ल्डच्या दबावाखाली काम करायचे. त्यावेळी अनेक चित्रपटांमध्ये बेकायदेशीरपणे पैसे गुंतवले गेले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रकरणात सिनेविश्वातील लोकांनी त्यांना साथ दिली नसती तर त्यांना कधीच काम मिळालं नसतं.”
सोनाली बेंद्रेने असंही सांगितलं की, तिने नेहमी अंडरवर्ल्डचा पैसा असलेल्या चित्रपटांपासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. या कामात सोनालीला तिचा पती गोल्डी बहल, जे त्या काळात सोनालीचा प्रियकर होते, यांचा पाठिंबा होता. गोल्डी बहल यांचा चित्रपटविश्वाशी जवळचा संबंध आहे आणि या कारणास्तव त्यांना अशा चित्रपटांची माहिती असायची ज्यात अवैध पैसे गुंतवले गेले होते. यासंदर्भात सोनालीने असंही सांगितलं की, अंडरवर्ल्डमुळे तिला अनेक चित्रपट सोडावे लागले होते.
आपल्या करिअरबद्दल बोलताना सोनाली बेंद्रे म्हणाली की, तिच्यासोबत असं अनेकवेळा घडलं जेव्हा ती एखादा चित्रपट साइन करायची, पण नंतर तिची भूमिका दुसऱ्या कलाकाराला दिली गेली. तिच्यासोबत अनेकदा असं घडलं की जेव्हा दिग्दर्शक किंवा सहकलाकार तिला फोन करून परिस्थिती समजावून सांगायचा आणि त्यांच्यावर दबाव असल्याचं सांगायचे. सोनाली बेंद्रे आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर सक्रिय झाली आहे. नुकतीच तिची ‘द ब्रोकन न्यूज’ ही वेब सीरिज प्रदर्शित झाली. या सीरिजला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. सोनालीने या मालिकेत पत्रकाराची भूमिका साकारली आहे.