दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांनी त्यांच्या दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यांनी साकारलेल्या विविध भूमिका आजही लोकप्रिय आहेत. प्रेक्षकांच्या मनावर कायमचा ठसा उमटविणारी त्यांची एक भूमिका म्हणजे ‘इंग्लिश विंग्लिश’मधील (English Vinglish) शशी गोडबोले. अत्यंत हलकी-फुलकी कथा आणि कसलाच ग्लॅमर नसलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं. या चित्रपटाला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. 5 ऑक्टोबर 2012 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यानिमित्त चित्रपटाची दिग्दर्शिका गौरी शिंदे (Gauri Shinde) यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
चित्रपटाला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गौरी यांनी श्रीदेवी यांच्या काही गोष्टींचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट श्रीदेवी यांच्यासाठीही खूप खास होता. कारण त्यांनी तब्बल 15 वर्षांनंतर या चित्रपटातून कमबॅक केलं होतं.
या संपूर्ण चित्रपटात श्रीदेवी यांनी अत्यंत सुंदर साड्या नेसल्या होत्या. चित्रपटातील त्यांचा साधा लूक प्रेक्षकांना खूप भावला होता. आता त्यांनी नेसलेल्या याच साड्यांचा लिलाव केला जाणार आहे. इतकंच नव्हे तर मुंबईत या चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगचं आयोजनसुद्धा करण्यात येणार आहे. या स्क्रीनिंगनंतर लिलावाची प्रक्रिया सुरू होईल.
श्रीदेवी यांच्या साड्या लिलाव करण्यामागेही खास कारण आहे. या लिलावातून मिळणारा पैसा हा मुलींच्या शिक्षणासाठी आणि एनजीओसाठी वापरला जाणार आहे. दिग्दर्शिका गौरी शिंदे यांनी त्या साड्या त्यांच्याकडे जपून ठेवल्या आहेत.
इंग्लिश विंग्लिश या चित्रपटात श्रीदेवी यांच्यासोबत आदिल हुसैन, प्रिया आनंद, सुलभा देशपांडे, सुजाता कुमार यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.