मुंबई- ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ (Adipurush) या चित्रपटाचा टीझर 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. हा टीझर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. काहींना यातील VFX आवडलं नाही तर काहींना त्यातील कलाकारांचा लूक पसंत पडला नाही. अखिल भारत हिंदू महासभाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनीसुद्धा चित्रपटातील सैफ अली खानच्या लूकची निंदा केली. आता रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ (Ramayan) या मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सुनील लहिरी (Sunil Lahiri) यांनी आदिपुरुषच्या टीझरवर प्रतिक्रिया दिली.
“टीझरच्या आधारावर कोणत्याची चित्रपटाबद्दल मत बनवणं योग्य नाही. आदिपुरुषचा टीझर पाहून मला हेच वाटलं की प्रत्येक निर्मात्याचं आपलं एक वेगळं मत असतं, वेगळा दृष्टीकोन असतो. आपल्याकडे श्री राम यांचा कोणताही फोटो नाही. राम किंवा रावण यांचा कुठलाही फोटो असता तर त्याआधारे काही म्हणता आलं असतं. राम यांच्या लूकवर कोणाचाही कॉपीराइट नाही. त्यामुळे त्यावरून प्रयोग केले जाऊ शकतात. लेखकाच्या मनात जी कथा असते, त्यानुसार भूमिका रुप घेतात. रावण आणि राम यांच्याविषयी प्रत्येकाची वेगळी भावना आहे”, असं सुनील लहिरी म्हणाले.
आदिपुरुषच्या टीझरवर बोलताना ते पुढे म्हणाले, “निर्मात्यांनी कॉपी करायला नाही पाहिजे. कॉपी केल्याने त्यात त्यांचं मूळ काम दिसणार नाही. कारण रामायणाच्या रुपात त्यांच्याजवळ मूळ गाथा आहे. लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये, याची काळजी निर्माते-दिग्दर्शकांनी घेतली पाहिजे. रामायण ही आपल्यासाठी एक भावना आहे. त्यातून बऱ्याच लोकांना शिकायला मिळतं.”
रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेत सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनीसुद्धा आदिपुरुषच्या टीझरवर प्रतिक्रिया दिली. “रामायणाच्या कथेला VFX शी जोडणं मला योग्य वाटलं नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे. वाल्मिकीजी आणि तुलसीजी यांनी लिहिलेल्या ग्रंथासोबत कोणतीही छेडछाड होऊ नये”, असं त्या म्हणाल्या.