मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतवर (Sushant Singh Rajput) आधारित ‘न्याय: द जस्टिस’ (The Justice ) चित्रपटास दिल्ली उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. हायकोर्टानं पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. सुशांतच्या वडिलांनी सुशांतसिंग राजपूत यांच्या जीवनावर आधारित कथित ‘न्याय द जस्टिस’ या चित्रपटावर बंदी घालण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
सुशांतच्या वडिलांनी म्हटलं की, ‘न्याय: द जस्टिस’ चित्रपटाचे प्रकाशन थांबवलं पाहिजे कारण हा चित्रपट त्याच्या मुलाची प्रतिमा बदनाम करण्यासाठी बनवला जात आहे. मात्र पुन्हा एकदा हायकोर्टाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.अर्थात वकील विकास सिंह हा चित्रपट मोठ्या पडद्यावर आणू न देण्याची लढाई लढले, मात्र हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणाले की या चित्रपटाच्या रिलीजसाठी कोणतीही अडचण नाही. चित्रपट रिलीज होण्यासाठी तयार आहे.
निर्माते झाले आनंदी
हायकोर्टाचा निर्णय या चित्रपटाच्या बाजूनं येताच चित्रपटाचे निर्माता राहुल शर्मा यांनी आनंद व्यक्त केला आहे आणि म्हटलं आहे की हा चित्रपट पैसे मिळवण्यासाठी आणि सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळवून देण्यासाठी एक पाऊल आहे. मात्र ते हे कसं करतील याविषयी ते स्पष्टपणे बोलले नाहीत. दिलीप गुलाटी दिग्दर्शित ‘न्याय: द जस्टिस’ चित्रपटाचं शूटिंग नुकतंच पूर्ण झालं आहे. या चित्रपटात टीव्ही अभिनेता झुबैर खान सुशांतसिंग राजपूतच्या भूमिकेत दिसला आहे तर श्रेया शुक्ला रिया चक्रवर्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. दुसरीकडे या चित्रपटात शक्ती कपूर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे प्रमुख राकेश अस्थानाची भूमिका साकारणार आहेत.
विशेष म्हणजे, 14 जून 2020 रोजी सुशांतसिंह राजपूत त्याच्या मुंबईतील घरात मृत अवस्थेत आढळला होता. ज्यानंतर या प्रकरणात सीबीआय, ईडी आणि एनसीबीचा तपास सुरू आहे. सुशांत प्रकरणात त्याची कथित गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीलाही तुरूंगात जावं लागलं होतं. या खटल्याची चौकशी अद्याप सुरू आहे आणि दररोज असे काही खुलासे होत राहतात.
मात्र वास्तविक प्रश्नाबद्दल अद्याप कोणत्याही एजन्सीनं तपास केला नाही आणि सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू कसा झाला याची योग्य माहिती अजूनही मिळालेली नाही. सुशांतनं हे जग सोडून आता एक वर्षाहून अधिक कालावधी झाला आहे मात्र अद्याप या प्रकरणाचा तपास सुरूच आहे.
संबंधित बातम्या