काही दिवसांपूर्वीच अभिनेता सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याची धमकी देणारं निनावी पत्र मिळालं होतं. त्यानंतर आता अभिनेत्री स्वरा भास्करला (Swara Bhasker) धमकीचं पत्र मिळालं आहे. स्पीड पोस्टद्वारे हे निनावी पत्र तिच्या निवासस्थानी पाठवण्यात आलं आहे. हस्ताक्षराने लिहिलेल्या या हिंदी पत्रात स्वराला सावरकर यांचा अपमान केल्याबद्दल जीवे मारण्याची धमकी (death threat) देण्यात आली आहे. या पत्राच्या शेवटी ‘इस देश के नौजवान’ असं लिहिलं आहे. धमकीचं हे पत्र मिळताच स्वराने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी ‘पीटीआय’ला दिली.
स्वरा नेहमीच सोशल मीडियावर बेधडकपणे तिची मतं मांडताना दिसते. सामाजिक विषय असो किंवा राजकीय, स्वराने अनेकदा तिची परखडं मतं ट्विटरवर व्यक्त केली आहेत. यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. 2017 मध्ये स्वराने सावरकरांविषयी एक ट्विट केलं होतं. ‘सावरकरांनी ब्रिटिश सरकारची माफी मागितली होती. तुरुंगातून सोडण्याची विनंती केली होती. याला नक्कीच ‘वीर’ म्हणत नाही’, असं ट्विट तिने केलं होतं. 2019 मध्ये तिने सावरकरांविषयी व्हिडीओसह आणखी एक ट्विट केलं होतं.
Savarkar APOLOGISED To the British govt. pleaded to be let out of jail! That’s not ‘Veer’ for sure… https://t.co/xgep5nWqJt
— Swara Bhasker (@ReallySwara) October 16, 2017
The planned construction of a most cowardly ‘braveheart’ Understanding “Veer” Savarkar https://t.co/0MZ9nGO3sX via @YouTube
— Swara Bhasker (@ReallySwara) April 18, 2019
उदयपूर हत्याकांडप्रकरणीही स्वराने ट्विट करत संताप व्यक्त केला होता. ‘निंदनीय आणि अत्यंत निषेधार्ह. गुन्हेगारांवर कायद्यानुसार त्वरीत आणि कडक कारवाई झाली पाहिजे. हा जघन्य गुन्हा आहे. अन्यायकारक! एकाने म्हटलंय.. देवाच्या नावाने मारायचं असेल तर सुरुवात स्वतःपासून करा. मूर्ख राक्षस,’ असं तिने लिहिलं.