कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांनी 21 सप्टेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. जवळपास 42 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर राजू यांचं बुधवारी सकाळी निधन झालं. ते 58 वर्षांचे होते. राजू यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित शोक व्यक्त केला. पण जेव्हा अभिनेत्री तापसी पन्नूला (Taapsee Pannu) राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर प्रतिक्रिया विचारली, तेव्हा ती त्याकडे साफ दुर्लक्ष केलं. तापसीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तापसी पन्नूला पापाराझींनी घेरलं होतं. यावेळी त्यांनी तिला राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर प्रतिक्रिया विचारली. मात्र पापाराझींनी मार्ग अडवल्याने तापसी त्यांच्यावर वैतागली.
पापाराझींनी तिचा मार्ग अडवल्यावर तापसी रागाने म्हणाली, “अरे भाऊ…तुम्ही जरा मागे व्हा. तुम्ही असं करू नका. मागे सरका.” पापाराझींच्या घोळक्याने त्रासलेली तापसी यावेळी राजू श्रीवास्तव यांच्याविषयीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून पुढे जाते.
तापसी पन्नूचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. काही जण तापसीची साथ देत आहेत. तर काही जण तिच्या वागण्यावरून ट्रोल करत आहेत. हल्लीच्या अभिनेत्रींना ॲटिट्यूड खूप आहे, असं एका युजरने लिहिलं. तर तापसी नेहमीच चिडलेली असते, असं दुसऱ्याने म्हटलं.
फोटोग्राफर किंवा पापाराझींवर वैतागण्याची तापसीची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिचे फोटोग्राफर्स आणि पापाराझींवर भडकल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
“तुम्ही माझ्यावर का ओरडत आहात? यात माझी काय चूक आहे? मला ज्या वेळेत बोलावलं गेलं, मी त्या वेळेत पोहोचली आहे. तुम्ही माझ्याशी नीट बोललात, तर मी तुमच्याशी नीट बोलेन. कॅमेरा माझ्यावर आहे ना, म्हणून तुम्हाला असं दिसतंय. हाच कॅमेरा जर तुमच्यावर असता तर तुम्ही कसे वागलात ते दिसलं असतं”, अशा शब्दांत ती एका कार्यक्रमात पापाराझींशी बोलताना दिसली होती.
तापसीचा ‘दोबारा’ हा चित्रपट 19 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. दिग्दर्शक अनुराग कश्यपने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.