हिंदी चित्रपटसृष्टीत “मी टू” (#metoo) चळवळीला सुरुवात करण्याशी संबंधित असणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने पुन्हा एकदा बॉलिवूडचे ज्येष्ठ आणि मराठी अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर दत्ता (Tanushree Dutta Viral Post) म्हणाली की, जर तिला काही झाले तर नाना, त्यांची कायदेशीर टीम आणि सहकारी आणि त्यांचे “बॉलिवूड माफिया मित्र” (Bollywood Mafia) यासाठी जबाबदार असतील. या अभिनेत्रीने आज, शुक्रवारी इन्स्टाग्रामवर स्वत: चा एक फोटो शेअर करत एक लांबलचक पोस्ट लिहिली आणि आपल्या अनुयायांना बॉलिवूड चित्रपटांवर पूर्णपणे बहिष्कार घालण्याचे आवाहन केले.तिने या पोस्टला कॅप्शन दिले आहे की, “जर मला कधी काही झाले तर याला #metoo आरोपी नाना पाटेकर, त्याचे वकील आणि सहकारी आणि त्याचे बॉलिवूड माफिया मित्र जबाबदार आहेत! कोण आहेत बॉलिवूड माफिया?? तेच लोक ज्यांचे नाव एसएसआर (सुशांतसिंग राजपूत) मृत्यू प्रकरणात वारंवार समोर आलेत.” (लक्षात घ्या की, सर्वांकडे एकच फौजदारी वकील आहे).
“त्यांचे चित्रपट बघू नका, त्यांच्यावर पूर्णपणे बहिष्कार टाका आणि दुष्ट सूडबुद्धीने त्यांच्या मागे जा. इंडस्ट्रीच्या सर्व चेहऱ्यांना आणि पत्रकारांना सामोरे जा, ज्यांनी माझ्याबद्दल खोट्या बातम्या पेरल्या आणि पी.आर.च्या लोकांबद्दलही मोहिमा राबवा. सर्वांच्या मागे लागा!! त्यांचे जीवन एक जिवंत नरक बनवा कारण त्यांनी मला खूप त्रास दिला! कायदा आणि न्याय अपयशी ठरले असतील, पण या महान राष्ट्राच्या लोकांवर माझा विश्वास आहे. जय हिंद… आणि बाय! फिर मिलेंगे”, असेही त्या पुढे म्हणाल्या.
या महिन्याच्या सुरुवातीला, माजी मिस इंडियाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तिने दावा केला होता की, ‘बॉलिवूड माफियांनी’ आणि महाराष्ट्रातील जुन्या राजकीय सर्किटने त्यांना खूप वाईट प्रकारे ‘त्रास दिला आणि लक्ष्य केले’. तिच्या इन्स्टाग्रामवर तिने केलेल्या खुलाशानंतर, दत्ताच्या अनुयायांना तिच्या तब्येतीबद्दल आणि तिच्या आयुष्याबद्दल काळजी वाटत होती. एका चाहत्याने कमेंट केली की, “सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर आधीच बॉलिवूड चित्रपट पाहणे सोडून दिले होते.. भगवान शिव तुम्हाला त्या राक्षसांचा सामना करण्याची आणि त्यांच्याशी लढण्याची शक्ती देवो.”
तनुश्रीने 2018 साली अभिनेता नाना पाटेकर, कोरिओग्राफर गणेश आचार्य आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर 2008 मध्ये त्यांच्या ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला होता, तेव्हा ती चर्चेत आली होती. या चित्रपटाच्या खास गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान नानांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोपही तिने केला आहे. तर दुसरीकडे नाना आणि इतर सेलेब्सनी सर्व दावे फेटाळून लावले आहेत.