पिंपरी चिंचवड : गेल्या काही दिवसांपासून द केरळ स्टोरी (The Kerala Story) चित्रपटामुळे मोठा वाद सुरू आहे. अनेकांनी थेट या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. मोठ्या वादानंतर हा चित्रपट 5 मे रोजी रिलीज झालाय. मात्र, चित्रपट (Movie) रिलीज होऊनही वाद कमी होण्याचे नाव घेत नाहीये. एककडे काही राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदी घातलीये तर काही राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आलाय. आता महाराष्ट्रातील एका शहरामध्ये द केरळ स्टोरी हा चित्रपट मोफतमध्ये बघायला मिळणार आहे. भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी अत्यंत मोठा निर्णय घेतलाय. आता द केरळ स्टोरी हा चित्रपट मोफतमध्ये पिंपरी चिंचवड शहरात बघायला मिळणार आहे.
द केरळ स्टोरी या चित्रपटाचे पिंपरी-चिंचवडमध्ये तीन शो मोफत दाखवण्यात येणार आहेत. यासाठी भाजपा शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच, धर्मांतरापासून हिंदू मुलींना वाचवण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. चिंचवडमधील सिटी वन मॉलमधील पी.व्ही.आर. थिएटरमध्ये 11 मे रोजी द केरळ स्टोरी चित्रपटाचे मोफत शोचे नियोजन केले आहे.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, धर्मांतर, लव्ह जिहाद यासारख्या घटना समाजिकदृष्ट्या आव्हानात्मक होत आहेत. याबाबत जाणीव आणि जागृती व्हावी. माता आणि भगिनी अशा कुप्रवृत्तीपासून दूर रहाव्यात, अशी आमची भावना आहे. राज्य सरकारने धर्मांतर, लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा करावा, अशी मागणीही आम्ही विधानसभा अधिवेशनात केली होती, असेही महेश लांडगे म्हणाले आहेत.
तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये द केरळ स्टोरी चित्रपटावर बंदी घालण्यात आलीये. दुसरीकडे कोची शहरामधील अनेक थिएटर मालकांनी मोठा निर्णय घेत चित्रपटाचे सर्व शो रद्द केले आहेत. मात्र, असे असताना देखील द केरळ स्टोरी हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर तूफान अशी कामगिरी करताना दिसत आहे. या चित्रपटाने जबरदस्त अशी ओपनिंगही केलीये. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे.
द केरळ स्टोरी चित्रपटावर काही राज्यांमध्ये बंदी घातली गेलीये तर काही राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आलाय. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये चित्रपट टॅक्स फ्री करण्याचा निर्णय तेथील सरकारने घेतला आहे. इतका विरोध होत असताना या चित्रपटाचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन हे सतत वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे सोमवारी देखील चित्रपटाने आपला जलवा हा दाखवलाय.