मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या जुडवा चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री रंभा हिचा कॅनडात मोठा अपघात झालाय. मुलीला शाळेतून आणताना रंभा हिच्या कारचा अपघात झाला असून यामध्ये मुलगी गंभीर जखमी आहे. रंभा हिने अपघाताचे काही फोटो आणि मुलीचे हाॅस्पिटलमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले. रंभा हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे की, अपघात मोठा होता. अपघातामध्ये कारचे मोठे नुकसानही झाले आहे.
रंभाने अपघाताची माहिती चाहत्यांसोबत शेअर करताना काही फोटोही टाकले आहेत. रंभाने पोस्ट शेअर करताना लिहिले की, मुलीला शाळेतून घेऊन येत असताना दुसऱ्या एका कारने आमच्या कारला धडक दिली. यावेळी मी आणि माझी मुलगी कारमध्ये होतो. आम्ही व्यवस्थित आहोत, काही किरकोळ मार लागला आहे. पण माझी छोटी साशा (मुलगी) अजूनही हॉस्पिटलमध्ये आहे.
रंभा हिने पोस्टमध्ये पुढे लिहिले की, कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा… हे अत्यंत महत्त्वाचे आहे. रंभा हिने ही पोस्ट इंन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. रंभाने शेअर केलेल्या फोटोमध्ये मुलगी दिसत असून ती हाॅस्पिटलच्या बेडवर झोपली असून डाॅक्टर तिच्यावर उपचार करताना देखील दिसत आहेत. सलमान खान, गोविंदा अशा प्रसिध्द स्टारसोबत रंभाने बाॅलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले.