मुंबई : अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) आणि अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आगामी ‘पुष्पा’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटातून रश्मिकाचा फर्स्ट लूक समोर आला आहे, ज्यात अभिनेत्रीची स्टाईल पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटणार आहे. या पोस्टरमध्ये रश्मिका तयार होताना दिसत आहे. तिने साडी नेसली आहे आणि तिच्या समोर गजरा ठेवलेला आहे.
रश्मिका या चित्रपटात ‘श्रीवल्ली’ची भूमिका साकारत आहे. बहुचर्चित ‘पुष्पा’ हा चित्रपट 2 भागांमध्ये रिलीज होणार आहे. यातील पहिल्या भागाचे नाव ‘पुष्पा : द राइज’ असे आहे, जो 2021मध्ये रिलीज होईल. पोस्टर शेअर करताना मेकर्सने लिहिले, आमची निडर ‘पुष्पा’ राजचे हृदय तिच्या प्रेमासाठी वितळवेलच! रश्मिकाला ‘श्रीवल्ली’ म्हणून भेटा. यासह, काही हॅशटॅगमध्ये लिहिले आहे, ‘सोलमेट ऑफ पुष्पा’, ‘पुष्पा द राइज’.
पुष्पा ही आंध्र प्रदेशातील रायलसीमा प्रदेशातील शेषाचलम डोंगरातील लाल चंदन तस्करांविषयीच्या वास्तविक जीवनातील घटनांवर आधारित कथा आहे. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा’ या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुन ‘पुष्पा राज’ नावाच्या चंदन तस्कराची भूमिका साकारत आहे.
काही दिवसांपूर्वी, चित्रपटाबद्दल घोषणा करताना, निर्मात्यांनी सांगितले की, चित्रपटाची कथा इतकी मोठी आहे की, या चित्रपटाला दोन भागांमध्ये रिलीज करावे लागेल. पुष्पा राजच्या परिचयासाठी आम्हाला मिळालेला प्रतिसाद विलक्षण होता आणि आता आम्हाला तो एका वेगळ्या पातळीवर नेण्याची इच्छा आहे. आमच्याकडे सर्वोत्तम स्टार, कलाकार आणि तंत्रज्ञ आहेत. आम्हाला आशा आहे की, प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट बघायला आवडेल. यासोबत अल्लू अर्जुन आणि रश्मिका पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
निर्मात्यांनी असेही जाहीर केले की, त्यांनी चित्रपटातील अॅक्शन सिक्वन्ससाठी 6 कोटी खर्च केले आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय स्टंटमॅन यात सामील होते आणि हे चित्रपटाच्या महत्त्वाच्या दृश्यांपैकी एक आहे.
रश्मिका लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात रश्मिकासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी रश्मिकाने या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. रश्मिका तिचे अनेक फोटो सेटवरून शेअर करत असते.
या चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर रश्मिका म्हणाली होती की, या चित्रपटात काम करताना तिला खूप आनंद होत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सीमा आणखी विस्तारल्या आहेत. मला आनंद आहे की मी बॉलिवूडमध्ये माझ्या करिअरची सुरुवात या सुंदर लोकांसोबत केली.