विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाची चर्चा अजूनही सोशल मीडियावर सुरू आहे. चित्रपटात कृष्णा पंडितची भूमिका साकारणारा अभिनेता दर्शन कुमार (Darshan Kumaar) याच्या दमदार कामगिरीचं कौतुक होत आहे. दर्शनने यामध्ये कृष्णा पंडितची भूमिका साकारली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने बॉलिवूडमध्ये इथपर्यंत येण्यामागचा त्याचा संघर्ष कसा होता, याविषयी सांगितलं. 2001 मध्ये ‘मुझे कुछ कहना है’ या चित्रपटात छोटी भूमिका साकारत त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर 2003 मध्ये त्याने सलमान खानच्या ‘तेरे नाम’मध्येही सहाय्यक भूमिका साकारली. 2014 मध्ये जेव्हा त्याने ‘मेरी कोम’ या चित्रपटात ओनलर कोमची भूमिका साकारली, तेव्हापासून त्याला खरी ओळख मिळाली. बॉलिवूडमधला ‘द काश्मीर फाईल्स’पर्यंतचा प्रवास आठवताना यावेळी दर्शन भावून झाल्याचं पहायला मिळालं.
“माझा इथपर्यंतचा प्रवास हा अनेक चढउतारांचा आहे. सुरुवातीपासूनच मला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं होतं. त्यामुळे त्या गोष्टी आठवल्या तरी मी भावूक होतो. मुंबईत ऑडिशन्ससाठी मला विविध ठिकाणी जावं लागत होतं. एका ऑडिशनसाठी मला फॉर्मल कपडे परिधान करायचे होते. पण चांगल्या शूजसाठी माझ्याकडे पैसे नव्हते. अंधेरी मार्केटमधून मी 200-300 रुपयांचे शूज विकत घेतले आणि तेच शूज मी बराच काळ वापरले. बसच्या प्रवासासाठी पुरेसे पैसे नसल्याने मी ऑडिशन्ससाठी चालत जायचो. बस तिकिटाच्या वाचवलेल्या पैशांतून मी पार्ले-जी बिस्किटचा पुडा विकत घ्यायचो. सोबत चहा मिळाला तर ठीक, नाहीतर पाण्यात मी ते बिस्किट खाऊन दिवसभर ऑडिशन्ससाठी भटकायचो”, अशा शब्दांत त्याने संघर्षकथा सांगितली.
एका ऑडिशनवरून परतताना चप्पल तुटल्याने दर्शनला काही किलोमीटर अनवाणीच चालत जावं लागलं होतं. तो प्रसंग आठवत त्याने पुढे सांगितलं, “मी रात्री 9-10 च्या सुमारास चालत येत होतो आणि माझी चप्पल तुटली. तुटलेली चप्पल हातात घेऊन मी पाच ते सात किलोमीटर चालत गेलो. जेवायलाही पुरेसे पैसे नसल्याने अनेकदा मी उपाशीपोटी झोपलो.”
दर्शनने ‘एनएच 10’, ‘आश्रम’, ‘द फॅमिली मॅन’ आणि ‘सरबजीत’ यांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. मेरी कॉमनंतर प्रसिद्धी मिळाली असली तरी अपेक्षित असं काम मिळालं नाही, अशी खंत त्याने यावेळी व्यक्त केली. ‘द काश्मीर फाईल्स’ने आतापर्यंत 250 कोटींचा गल्ला जमवला आहे. 1990 मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर हा चित्रपट भाष्य करतो.
हेही वाचा:
राजामौलींच्या RRRने ‘द बॅटमॅन’चा विक्रम मोडला; कमाई 500 कोटींच्या घरात
‘मी चुकलो..’; ऑस्कर पुरस्कार सोहळ्यानंतर विल स्मिथचा जाहीर माफिनामा