मुंबई : अलीकडेच, ‘मिस युनिव्हर्स स्पर्धा 2021’ ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारताच्या हरनाज संधूने विजेतेपद पटकावले आहे. हा पराक्रम एका भारतीय वंशाच्या महिलेने तब्बल 21 वर्षांनंतर केला आहे. हरनाजच्या नावाची घोषणा होताच, तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. साऱ्या जगाच्या नजरा या क्षणाकडे लागल्या होत्या. हा क्षण पाहण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाही तिथे उपस्थित होती.
वास्तविक, ती या मेगा इव्हेंटचे परीक्षण करण्यासाठी आली होती. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने नुकतीच मिस युनिव्हर्सच्या इतिहासातील सर्वात तरुण परीक्षक बनून भारताचा गौरव केला आहे. मिस युनिव्हर्स स्पर्धा 2021साठी, अभिनेत्रीने डिझायनर मायकेल सिन्को द्वारे डिझाईन केलेला ब्रॉड शिमरसह हॉल्टरनेक डीप ओव्हल कटसह ऑफ-द-शोल्डर गाऊन परिधान केला होता. आता उर्वशी या स्पर्धेचं परीक्षण करण्यासाठी मिळालेली मोठी रक्कम घेऊन चर्चेत आहे.
विशेष म्हणजे, उर्वशी ही एकमेव भारतीय आणि सर्वात तरुण परीक्षक होती, जिला तब्बल 1.2 दशलक्ष डॉलर्सची ऑफर देण्यात आली आहे. जर आपण या डॉलरचे रुपांतर रुपयात केले तर ते सुमारे 8 कोटी रुपये होतात. जेव्हा ती या सौंदर्य स्पर्धेचं परीक्षण करण्यासाठी गेली तेव्हा उर्वशीने इस्त्रायलचे माजी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना भगवद्गीतेची प्रत देत सर्वांना आश्चर्यचकित केले. इतकंच नाही तर तिने तेथील राजकारण्यांना हिंदीच्या काही ओळीही शिकवल्या.
दरम्यान, 21 वर्षांनंतर हरनाज संधूने मिस युनिव्हर्सचा भारतात घरी आणला. जेव्हा हा कार्यक्रम सुरु होता तेव्हा उर्वशीने इंस्टाग्रामवर हरनाझच्या विजयाचा क्षण कॅप्शनसह शेअर केला होता.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, उर्वशी रौतेला लवकरच जिओ स्टुडिओच्या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या सीरिजमध्ये ती रणदीप हुड्डा सोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘तिरुत्तू पायले 2’च्या हिंदी रिमेकसह ही अभिनेत्री द्विभाषिक थ्रिलर ब्लॅक रोजमध्ये काम करणार आहे. गुरू रंधावासोबत ‘डूब गए’ आणि मोहम्मद रमजानसोबत ‘वर्सासे बेबी’ या गाण्यांसाठीही ही अभिनेत्री चर्चेत आहे. एवढेच नाही तर उर्वशी 200 कोटी रुपयांच्या बिग बजेट चित्रपट ‘द लीजेंड’मधून तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.