मुंबई : भारतातला लाखो दिल की धडकन, बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याला जीवे मारण्याची धमकी आल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. विशेष म्हणजे फक्त चाहतेच नाही तर सर्व प्रेक्षक वर्गामध्ये खळबळ उडाली आहे. सलमान खान याचा अफाट चाहता वर्ग आहे. त्यामुळे अशा दिग्गज अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी येणं ही साधी-सोपी गोष्ट नाहीय. गेल्या अनेक दिवसांपासून सलमान खानला विविध माध्यमांतून धमकी दिली जातेय. या प्रकरणात आधी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचं नाव समोर आलेलं. पण आता एक आणखी कुख्यात गँगस्टरचं नाव पुढे आलं आहे. विशेष म्हणजे सलमान खानच्या मॅनेजरला ई-मेलच्या माध्यमातून या गँगस्टरचं नाव घेऊन सूचक इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी नेमकी काय कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सलमान खानचे मॅनेजर प्रशांत गुंजाळकर यांना धमकीचं नवं ई-मेल मिळालं आहे. हा मेल रोहित गर्गच्या नावाच्या व्यक्तीकडून आलाय. ई-मेल पाठवणाऱ्याने या मेलमध्ये कुख्यात गँगस्टर गोल्डी ब्रार याचं नाव घेतलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गायक सिद्धू मुसेवाल याच्या हत्या प्रकरणात गोल्डी ब्रार याचं नाव समोर आलं होतं. हा गोल्डी ब्रार सिद्धू मुसेवाल हत्याकांडाचा मास्टरमाईंड होता, अशी माहिती समोर आलेली. आता याच गोल्डी ब्रारचं नाव सलमान खान यांच्या धमकी प्रकरणात पुढे आल्याने खळबळ उडाली आहे.
सलमान खानला धमक्या मिळाल्यानंतर त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केवळ सलमान खानच नाही तर त्याच्या कुटुंबालाही पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. सलमान खानच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे पथक 24 तास त्याच्या घराबाहेर तैनात आहेत. मुंबई पोलीस कर्मचारी अजूनही सलमान खानच्या घराबाहेर तैनात आहे. सलमान खानला मिळालेल्या धमकीनंतर त्याच्या घराबाहेर फॅन्सची गर्दी जमू दिली जात नाहीय. सलमानचे मॅनेजर प्रशांत गुंजाळकर यांना धमकीचा ई-मेल पाठवून सलमानशी बोलण्यास सांगितले होते. हा ईमेल रोहित गर्गच्या नावाने आला होता.
“गोल्डी ब्रार याला तुमच्या बॉसशी म्हणजेच सलमान खानशी बोलायचे आहे. त्याने मुलाखत पाहिली असेल. पाहिली नसेल तर तुम्ही बघायला सांगा. जर तुम्हाला प्रकरण बंद करायचे असेल तर प्रकरण पूर्ण करा. समोरासमोर बोलायचे असेल तर तेही सांगा. मी तुम्हाला वेळीच कळवले आहे. पुढच्या वेळी तुम्हाला फक्त धक्काबुक्की दिसेल”, अशा इशारा ई-मेलद्वारे करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित प्रकरणी वांद्रे पोलिसांकडून तपास सुरु आहे. पोलिसांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि रोहित ब्रार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.