दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) हे त्यांच्या आगामी ‘लायगर’ (Liger) या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे दोन्ही कलाकार देशभरात फिरत असून त्यांना चाहत्यांचं खूप प्रेम आणि पाठिंबा मिळत आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटाला सोशल मीडियावर बहिष्काराच्या ट्रेंडला सामोरं जावं लागलं. त्याचा फटका चित्रपटाच्या कमाईवर झाला. आता अचानक बॉयकॉट लायगर असा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे. यामागचं कारण निर्माता-दिग्दर्शक करण जोहर असल्याचं म्हटलं जात आहे. यावर आता विजय देवरकोंडाने ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. अर्जुन रेड्डी फेम विजय देवरकोंडाने त्याच्या लायगर या चित्रपटाच्या बहिष्काराच्या ट्रेंडनंतर एक ट्विट केलं आहे. त्याचं हे ट्विट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. विजयने तेलुगू भाषेत हे ट्विट केलं असलं तरी या ट्विटद्वारे त्याने बॉयकॉटचा ट्रेंड सुरू करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिल्याचं दिसून येतंय.
विजय देवरकोंडाने त्याच्या ट्विटमध्ये कुठेही बहिष्कार ट्रेंडचा उल्लेख केलेला नाही. आपण ही लढाई लढण्यास तयार असून इतरांची पर्वा करत नसल्याचं त्याने लिहिलं आहे. विजयने पुढे लिहिलं की “जेव्हा आपण धर्मानुसार चालतो, तेव्हा आपल्याला इतरांची काळजी करण्याची गरज नाही, आपण पुन्हा लढू.” या ट्विटमध्ये त्याने फायर इमोजी पोस्ट करत #Liger लिहिलं आहे.
आता तुम्ही विचार करत असाल की इतकं प्रेम आणि पाठिंबा मिळूनही विजय देवरकोंडाच्या चित्रपटाला अचानक एवढ्या नाराजीचा सामना का करावा लागतोय. तर बॉयकॉट लायगरचा ट्रेंड करणारे काही युजर्स करण जोहरला यामागचं कारण ठरवत आहेत. तर काहीजण बॉयकॉट ट्रेंडवरील विजय देवरकोंडाच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत आहेत.
इंडिया टुडेशी संवाद साधताना विजय म्हणाला होता, “जेव्हा आमिर खान सर लाल सिंह चड्ढा बनवतात, तेव्हा त्यांचं नाव चित्रपटात स्टार म्हणून येतं. पण दोन ते तीन हजार कुटुंबं त्या चित्रपटाशी जोडलेली असतात. जेव्हा तुम्ही एखाद्या चित्रपटावर बहिष्कार टाकता, तेव्हा तुमचा केवळ आमिर खानलाच फरक पडत नाही, तर रोजगाराचं साधन गमावणाऱ्या हजारो कुटुंबांवर परिणाम होत असतो.”
Manam Correct unnapudu
Mana Dharmam manam chesinapudu
Evvadi maata vinedhe ledu.
Kotladudham ?#Liger— Vijay Deverakonda (@TheDeverakonda) August 20, 2022
विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांचा ‘लायगर’ हा चित्रपट येत्या 25 ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘लायगर’चं दिग्दर्शन साऊथ सिनेसृष्टीतील मोठे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी केलं आहे. हा चित्रपट संपूर्ण भारतात पाच विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून विजय बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.