दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाचा (Vijay Deverakonda) स्पोर्ट्स ॲक्शन चित्रपट लायगर (Liger) हा उद्या म्हणजेच 25 ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. पुरी जगन्नाथ दिग्दर्शित या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. ॲडव्हान्स बुकिंगची सुरुवातीची आकडेवारी पाहता विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे (Ananya Panday) यांना पहिल्याच दिवशी हिंदी भाषिक राज्यांमध्ये धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘बॉयकॉट लायगर’ ट्रेंडचा परिणाम चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच ॲडव्हान्स बुकिंगद्वारे होणाऱ्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होऊ लागला आहे. बॉयकॉट बॉलिवूड, बॉयकॉट लाल सिंग चड्ढा आणि विजय देवरकोंडाच्या विधानांमुळे हिंदी पट्ट्यातील ‘लायगर’ची क्रेझ फारशी शिल्लक राहिली नसल्याचं दिसून येत आहे. लागरच्या हिंदी भाषेसाठी केवळ 9,832 ॲडव्हान्स तिकिटं बुक झाली आहेत. म्हणजेच ॲडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातून विजयच्या चित्रपटाची पहिल्या दिवशी केवळ 23 लाख रुपये इतकी कमाई होणार आहे.
मात्र तेलुगू भाषिक राज्यांमध्ये या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळत आहे. याठिकाणी ‘लायगर’ची सुमारे 4 लाख 9,742 तिकिटं विकली गेली आहेत. म्हणजेच या चित्रपटाच्या तेलुगू व्हर्जनने ॲडव्हान्स बुकिंगद्वारे 7.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याचवेळी तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेतील चित्रपटाची अनुक्रमे 7565, 944 आणि 173 ॲडव्हान्स तिकिटं बुक झाली आहेत. पहिल्या दिवसाच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर पहिल्या दिवशी हा चित्रपट जवळपास 25 कोटींची कमाई करू शकेल.
तेलुगू- 4,09,742 तिकिटांची विक्री- 7.35 कोटी रुपये कमाई
हिंदी- 9,832 तिकिटांची विक्री- 23 लाख रुपये कमाई
तमिळ- 7,565 तिकिटांची विक्री- 10 लाख रुपये कमाई
मल्याळम- 944 तिकिटांची विक्री- 1.35 लाख रुपये कमाई
कन्नड- 173 तिकिटांची विक्री
या चित्रपटाचं बजेट जवळपास 90 कोटींच्या घरात असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बालाने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत दिली. हा तेलुगू आणि हिंदी अशा दोन भाषेतील चित्रपट असल्याने विजयने जवळपास 20 ते 25 कोटी रुपये मानधन घेतल्याचं त्यांनी सांगितलं.