गोविंद ठाकुर, मुंबई : बाॅलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान याच्यासाठी उद्याचा (२५ जानेवारी) दिवस अत्यंत खास आहे. कारण शाहरुख खान हा तब्बल चार वर्षांनंतर पठाण चित्रपटाच्या माध्यमातून पुनरागमन करतोय. शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या या चित्रपटाकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा आहेत. चार वर्षापासूनच शाहरुख खान याचे चाहते त्याच्या याच पुनरागमनाची वाट पाहात होते. मात्र, शाहरुख खान याच्या पठाण (Pathaan) चित्रपटाला मोठ्या प्रमाणात विरोध होताना देखील दिसतोय. एकीकडे चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी क्रेझ आहे. दुसरीकडे या चित्रपटाच्या विरोधात अनेकांनी मोर्चा वळवला आहे. सुरूवातीपासूनच सांगितले जातंय की, या चित्रपटामुळे हिंदूचा भावना दुखावल्या आहेत. आता चित्रपटाला (Movie) अवघे काही तास रिलीज होण्यास शिल्लक असतानाच कडाक्याचा विरोध होताना दिसत आहे. यामुळे आता याचा चित्रपटावर नेमका काय परिणाम पडतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
पठाण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच मुंबईमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आता थेट चित्रपटगृहांना नोटीस दिल्या आहेत. यामुळे चित्रपटाच्या समस्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. हा चित्रपट २५ जानेवारी म्हणजे उद्या रिलीज होतोय.
या अगोदर बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते पठाण चित्रपटाचे पोस्टर फाडून निषेध करताना दिसले होते. इतकेच नाहीतर मुंबईतील बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सर्व चित्रपटगृहांना हा चित्रपट प्रदर्शित न करण्याच्या नोटिसाही दिल्या आहेत.
बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते पठाण चित्रपटाचे पोस्टर फाडून आंदोलन करत आहेत. यामुळे चित्रपटाच्या बाॅक्स आॅफिसवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.
हे सर्व सुरू असतानाच शाहरुख खान याच्यासह चित्रपट निर्मात्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी देखील पुढे आलीये. काही वेबसाईटने पठाण हा चित्रपट अगोदरच लीक केल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हणण्यात आले आहे.
शाहरुख खान याचे चाहते चित्रपटाची महागडी तिकिटे बुक करताना दिसत आहेत. शाहरुख खान हा चार वर्षांनंतर पुनरागमन करत असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड असा उत्साह बघायला मिळतोय.