उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्यासाठी पोस्ट लिहिल्या. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. अभिनेत्री दिया मिर्झानेही (Dia Mirza) गुरुवारी रात्री उद्धव ठाकरेंसाठी पोस्ट लिहिली. दियाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यामागचं कारण म्हणजे त्यावर ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी केलेली कमेंट. विवेक अग्निहोत्रींनी दिया मिर्झाच्या या ट्विटवर उपरोधिक कमेंट केली आहे. ‘लोकांची आणि प्लॅनेटची (पृथ्वी) काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद’, असं दियाने लिहिलं. त्यावर प्रश्न विचार अग्निहोत्रींनी लिहिलं, ‘कोणतं प्लॅनेट? प्लॅनेट बॉलिवूड?’
उद्धव ठाकरे यांच्या जागी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची वर्णी लागल्यानंतर दियाने गुरुवारी रात्री ट्विटरवर एक पोस्ट लिहिली. ‘धन्यवाद उद्धव ठाकरेजी. तुम्ही लोकांची आणि या ग्रहाची काळजी घेतली. मी माझी कृतज्ञता आणि आदर व्यक्त करते. तुम्हाला देशसेवेच्या आणखी अनेक संधी मिळू देत,’ असं तिने लिहिलं. या ट्विटमध्ये तिने आदित्य ठाकरेंनाही टॅग केलं. दियाच्या ट्विटला उत्तर देताना विवेक यांनी लिहिलं, ‘कोणतं प्लॅनेट? प्लॅनेट बॉलिवूड?’ अग्निहोत्रींच्या या ट्विटवर अनेकांनी हसण्याचे इमोजी पोस्ट केले. तर काहींनी दियाची बाजू घेतली. ‘ते दियाचं मत आहे, तुम्हाला त्यात मधे पडण्याची गरज नव्हती’, असंही काहींनी लिहिलं.
Which planet? Planet Bollywood? pic.twitter.com/VleaRuhxDT
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) July 1, 2022
बहुचर्चित कुलाबा- वांद्रे – सिप्झ मेट्रो- 3चं कारशेड आरे कॉलनीमध्येच करण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारने गुरुवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पहिला धक्का दिला. कारशेड आरेमध्येच करण्यास सरकार तयार असल्याची भूमिका न्यायालयात मांडण्याची सूचना राज्याच्या महाधिवक्त्यांना देण्यात आली आहे. राज्यात शिवसेना- भाजप युती सरकारच्या काळात मेट्रो- 3चं कारशेड आरेमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार कारशेडचं 25 टक्के कामही पूर्ण झालं होतं. मात्र, नोव्हेंबर 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. या कारशेडमुळे पर्यावरणाचं नुकसान होणार असल्याचं सांगत कारशेड आरेऐवजी कांजूरमार्ग इथं करण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला होता.