‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) हे ट्विटरवर बऱ्यापैकी सक्रिय असतात. विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर ते बेधडकपणे आपली मतं व्यक्त करताना दिसतात. नुकत्याच एका ट्विटमध्ये त्यांनी बॉलिवूडचे सुपरस्टार्स शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि सलमान खान (Salman Khan)यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘शाहरुख खान हा अजूनही बॉलिवूडचा किंग का आहे’, अशा आशयाचा लेख एका न्यूज पोर्टलने पब्लिश केला होता. हाच लेख शेअर करत विवेक यांनी लिहिलं, ‘जोपर्यंत बॉलिवूडमध्ये किंग्ज, बादशाह, सुलतान असतील तोपर्यंत तो बुडतच राहणार. लोकांच्या कथांसह ती लोकांची इंडस्ट्री बनवा, तेच जागतिक चित्रपट उद्योगाचं नेतृत्व करेल.’ या ट्विटच्या शेवटी त्यांनी ‘तथ्य’ असा हॅशटॅग वापरला आहे.
शाहरुखला बॉलिवूडचा किंग म्हटलं जातं, तर ‘सुलतान’ हा सलमानचा चित्रपट आहे. ‘बादशाह’ हेसुद्धा शाहरुखच्या एका चित्रपटाचं नाव आहे. त्यामुळे विवेक अग्निहोत्री यांनी नाव न घेता बॉलिवूडच्या या दोन मोठ्या कलाकारांवर निशाणा साधल्याचं म्हटलं जात आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून विवेक अग्निहोत्री हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. इतकंच नव्हे तर बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने चांगली कामगिरी केली. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी यांसह इतरही नामांकित कलाकारांच्या भूमिका आहेत.
As long as Bollywood has Kings, Badshahs, Sultans, it will keep sinking. Make it people’s industry with people’s stories, it will lead the global film industry. #FACT https://t.co/msqfrb7gS3
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) July 14, 2022
काही दिवसांपूर्वी अग्निहोत्री यांनी अभिनेत्री दिया मिर्झाच्या ट्विटवरही उपरोधिक कमेंट केली होती. ‘लोकांची आणि प्लॅनेटची (पृथ्वी) काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद’, असं दियाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसाठी यांच्यासाठी ट्विटरवर लिहिलं होतं. त्यावर प्रश्न विचार अग्निहोत्रींनी लिहिलं होतं, ‘कोणतं प्लॅनेट? प्लॅनेट बॉलिवूड?’ अग्निहोत्रींच्या या ट्विटवर अनेकांनी हसण्याचे इमोजी पोस्ट केले होते. तर काहींनी दियाची बाजू घेतली होती.