‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणारे विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा कार्यक्रम ऑक्सफर्ड विद्यापिठाने (Oxford University) रद्द केला आहे. त्यामुळे नाराज झालेल्या अग्निहोत्रींनी ऑक्सफर्डच्या विद्यार्थी संघटनेविरोधात खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यामध्ये त्यांनी या घटनेचा उल्लेख ‘हिंदुफोबिक’ असं म्हटलं आहे. ऑक्सफर्ड विद्यापिठात हिंदू विद्यार्थी हे अल्पसंख्याक असून विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष हा पाकिस्तानी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विवेक अग्निहोत्री यांना तिथं भाषण देण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. पण ऐनवेळी विद्यापिठाकडून हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.
“मला ईमेलद्वारे कार्यक्रमाबद्दल माहिती देण्यात आली होती. त्यात सगळं काही ठरलं होतं. पण काही तासांपूर्वीच मला कार्यक्रम रद्द झाल्याचा मेल आला. चुकून दोन बुकिंग झाल्याने हा कार्यक्रम होऊ शकत नाही, असं स्पष्टीकरण त्यांच्याकडून देण्यात आलं. माझा कार्यक्रम मलाच न विचारता 1 जुलै रोजी करण्याचं ठरवण्यात आलं. कारण त्यादिवशी विद्यापिठात विद्यार्थी नसतील आणि कार्यक्रमाला काही अर्थ राहणार नाही”, अशी तक्रार त्यांनी केली.
“ते मला नाही तर लोकशाहीने निवडून आलेल्या भारत सरकारला आणि खासकडून नरेंद्र मोदींना रद्द करत आहेत. आमच्यावर इस्लामोफोबिक असल्याचा शिक्का मारला जातोय. ते हिंदूंना आणि नरसंहाराला नाकारत आहेत. जणू काही हजारो काश्मिरी हिंदूंना मारणं हे हिंदुफोबिक नाही तर त्या सत्यावर आधारित चित्रपट बनवणं म्हणजे इस्लामोफोबिक आहे”, असं ते पुढे म्हणाले.
IMPORTANT:
Yet another Hindu voice is curbed at HINDUPHOBIC @OxfordUnion.They have cancelled me. In reality, they cancelled Hindu Genocide & Hindu students who are a minority at Oxford Univ. The president elect is a Paksitani.
Pl share & support me in this most difficult fight. pic.twitter.com/4mGqwjNmoB— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) May 31, 2022
“मी सध्या युरोपमध्ये आहे. केंब्रिज विद्यापिठ, ऑक्सफर्ड विद्यापिठ, ब्रिटीश संसद, जर्मनी आणि नेदरलँडमधील अनेक प्रतिष्ठित ठिकाणांहून मला आमंत्रण आलं होतं. त्यानंतर हा दौरा ठरवण्यात आला. पण काल जेव्हा मी केंब्रिज विद्यापिठात पोहोचलो तेव्हा मला समजलं की आम्ही कार्यक्रमाचा व्हिडीओ रेकॉर्ड करू शकत नाही. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे. काही काश्मिरी मुस्लीम आणि पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी विरोध केल्याने असं घडलं. हे तेच विद्यापीठ आहे जिथे सुभाषचंद्र बोस यांनी शिक्षण घेतलं होतं”, असं त्यांनी व्हिडीओत सांगितलं. हा व्हिडीओ पोस्ट करत अग्निहोत्री यांनी त्यांना पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. “या विद्यापिठाविरोधात मी खटला दाखल करत असून मला तुम्ही सर्वांनी मदत करा. मी नुकसान भरपाईची मागणी करणार आहे”, असं ते म्हणाले.
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’मध्ये 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा दाखवण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यातील लाखो हिंदूंना स्वतःचं घर सोडावं लागलं होतं. यामध्ये अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती यांच्याही मुख्य भूमिका आहेत.