बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘झुंड’ (Jhund) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ‘सैराट’, ‘फँड्री’, ‘नाळ’ यांसारख्या एकापेक्षा एक दमदार चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या नागराज मंजुळेंचा (Nagraj Manjule) हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट आहे. नागपुरातील विजय बारसे (Vijay Barse) या फुटबॉल प्रशिक्षकांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाची कथा असून यामध्ये बिग बी बारसेंची भूमिका साकारत आहेत. टीझर, ट्रेलरपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आमिर खान, धनुष यांसारख्या कलाकारांनीही ‘झुंड’चं तोंडभरून कौतुक केलं आहे. झोपडपट्टी, फुटपाथवर राहणाऱ्या मुलांना घेऊन बारसे हे फुटबॉलची टीम बनवतात. सोनसाखळी चोरणाऱ्या, गांजा विकणाऱ्या, गुंडगिरी करणाऱ्या मुलांची टीम बनवू पाहण्याचं स्वप्न ते पाहत असतात. हे विजय बारसे नेमके कोण आहेत, ते जाणून घेऊयात..
फुटक्या बादलीसोबत खेळणारी मुलं पाहिली अन् सुरू झाला प्रवास
आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’च्या एका एपिसोडमध्ये विजय यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी सांगितलं, 2000 च्या सुरुवातीला नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून काम करत असताना, त्यांनी एकदा काही मुलांना पावसात फुटक्या बादलीला लाथ मारत त्याभोवती खेळताना पाहिलं. विजय यांनी त्या मुलांना खेळण्यासाठी फुटबॉल दिला आणि त्यांनी ते आनंदाने स्वीकारलं. TEDx टॉकमध्ये त्यांनी सांगितलं, की अशाच मुलांचा दुसरा गट टेनिस बॉलभोवती खेळताना त्यांना दिसला. त्या मुलांना विजय यांनी खेळाच्या मैदानात एकत्र आणलं. जोपर्यंत ही मुलं मैदानात खेळतील, तोपर्यंत ते इतर वाईट प्रवृत्तींपासून दूर राहतील, हे त्यांच्या लक्षात आलं. देशाचं भविष्य घडवण्यासाठी ते सक्रियपणे योगदान देऊ शकतात, असं त्यांचं मत होतं. “मला समजलं होतं की ही मुलं जोपर्यंत मैदानावर खेळत होती तोपर्यंत ती वाईट सवयींपासून दूर होती. एखादा शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना यापेक्षा आणखी काय देऊ शकणार” असं ते ‘सत्यमेव जयते’च्या एपिसोडमध्ये म्हणाले.
वडिलांबद्दलचा लेख वाचून अमेरिकेत राहणारा मुलगा परतला
2002 मध्ये अशा पद्धतीने झोपडपट्टी फुटबॉलचा प्रवास सुरू झाला. कालांतराने हाच खेळ स्लम सॉकर म्हणून प्रसिद्ध झाला. जेव्हा त्यांच्या सहकाऱ्याने विचारलं की त्यांनी लीगचं नाव झोपडपट्टी फुटबॉल असं का ठेवलं? तेव्हा विजय यांनी सांगितलं, “मला माहित आहे की सर्व खेळाडू झोपडपट्टीत राहून आले आहेत आणि मला त्यांच्यासाठीच काम करायचे आहे. म्हणून मी हे नाव ठेवलं.”
झोपडपट्टी फुटबॉल लीगचा प्रवास सुरु झाला आणि पाहता पाहता शहर व जिल्हा स्तरावर सामने खेळवले जाऊ लागले. 2003 मध्ये एका वृत्तपत्रात विजय यांच्या कामाबद्दलचा लेख छापून आला, तेव्हा अनेकांपर्यंत त्यांची किर्ती पोहोचली. स्लम सॉकर लीग ही देशभरात चर्चेत आली, कारण देशभरातील प्रशिक्षक आणि मुलांना त्याच्याशी जोडलं जायचं होतं. सुरुवातीच्या काळात, विजय यांना निधी देणारे प्रायोजक उपलब्ध होत नव्हते आणि तेव्हा ते स्वतःचा पैसा खर्च करत होते. जेव्हा अमेरिकेत राहणार्या त्यांच्या मुलाने एका अमेरिकन वृत्तपत्रात वडिलांबद्दलचा लेख वाचला, तेव्हा तो मदतीसाठी परत आला.
“मी फुटबॉलच्या विकासाला नाही तर फुटबॉलच्या माध्यमातून विकासाला चालना देत आहे”
2018 मध्ये ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीतील बारसे यांचं वक्तव्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलं. “मी एक क्रीडा प्रशिक्षक आहे. पण मी फुटबॉलच्या विकासाला चालना देत नाही. मी फुटबॉलच्या माध्यमातून विकासाला चालना देत आहे”, असं ते म्हणाले होते.
कामाची सर्वांत मोठी पोचपावती
2007 मध्ये स्लम सॉकरची राष्ट्रीय स्पर्धा बीबीसीने कव्हर केली होती. त्यावेळी ‘होमलेस वर्ल्डकप’चे तत्कालीन संचालक अँडी हुक्स यांनी बारसे यांना दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनला आमंत्रित केलं होतं. तिकडे गेल्यानंतर बारसे यांची नेल्सन मंडेला यांच्याशी भेट झाली. “त्या दिवशी मला माझ्या कामाची सर्वात मोठी पोचपावती मिळाली जेव्हा त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, ‘तू खूप चांगलं काम करत आहेस’,” असा अनुभव बारसे यांनी सांगितला.
‘झुंड’मध्ये अनेक मराठी कलाकारांचे चेहरे पहायला मिळतात. ‘सैराट’ या चित्रपटाची टीम म्हणजेच रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. अजय-अतुल या लोकप्रिय जोडगोळीने चित्रपटाला संगीत दिलं आहे. चित्रपटात छाया कदम आणि किशोर कदम यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
हेही वाचा:
नागराजमुळे त्या पठ्ठ्याचं आयुष्यच बदललं; 20 वर्षीय मुलाचं स्वप्न साकार
‘अमिताभ बोलतो का रे सेटवर, समोरच्याला घाबरवत असेल ना तो’; किशोर कदम म्हणतात..
‘कच्चा बदाम नाही, शिवरायांच्या महाराष्ट्राची लेक’; ‘पावनखिंड’च्या गाण्यावर चिमुकलीचा डान्स