अभिनेत्री झरीन खानने (Zareen Khan) 2010 मध्ये ‘वीर’ (Veer) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. झरीनला अभिनेता सलमान खानने (Salman Khan) बॉलिवूडमध्ये लाँच केल्याचं म्हटलं जातं. तिचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करू शकला नाही. गेल्या 12 वर्षांपासून ती बॉलिवूडमध्ये काम करतेय, मात्र तिला अपेक्षित असं यश मिळू शकलं नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत झरीनने तिच्या करिअरविषयी वक्तव्य केलं आहे. “या इंडस्ट्रीत राहायचं म्हटल्यास तुम्हाला सर्व पार्ट्यांना हजेरी लावावी लागते, लोकांना भेटावं लागतं. करिअरच्या सुरुवातीला मला याबद्दल फारसं काही माहित नव्हतं. अशा पार्ट्यांना हजेरी लावणं खूप महत्त्वाचं असतं हे मला माहित नव्हतं”, असं ती म्हणाली.
“इंडस्ट्रीमधल्या अनेकांसोबत मैत्री करण्यासाठी मी फारसे प्रयत्न न केल्याने मला अनेक संधींना मुकावं लागलं. सध्याचा ट्रेंड असा आहे की इथे प्रत्येकजण प्रत्येकाचा मित्र आहे आणि फक्त मित्रांसोबतच काम केलं जातंय. जर मित्रांच्याच शिफारशी बॉलिवूडमध्ये केल्या जात असतील तर माझ्यासारख्या लोकांना कसं काम मिळेल”, असा सवाल झरीनने यावेळी केला. “लोकांना माझ्या कामाची क्षमताच माहित नाही. त्यांनी आतापर्यंत मला स्क्रीनवर ज्या भूमिकांमध्ये पाहिलं, त्यालाच अनुसरून मला भूमिका दिल्या जातात. त्यावरूनच माझं परीक्षण केलं जातं. पण त्या पलीकडे जाऊन मला संधी दिली जात नाही”, अशी खंत झरीनने व्यक्त केली.
झरीनचा ‘हम भी अकेले, तुम भी अकेले’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच ओटीटीवर प्रदर्शित झाला. यामध्ये मिळालेल्या भूमिकेसाठी तिने दिग्दर्शकांचे आभार मानले. “माझं ऑडिशन घ्या आणि मला एक संधी देऊन तर पहा. हम भी अकेले तुम भी अकेलेच्या निमित्ताने मला एक वेगळी भूमिका साकारायला मिळाली याचं मला समाधान आहे. मी फक्त हॉट आणि सुंदर दिसण्यावर लक्ष केंद्रित करू शकत नाही”, असं तिने सांगितलं.
हेही वाचा:
‘चावडी पुन्हा एकदा भरली, पण..’; ‘बिग बॉस मराठी 3’चे स्पर्धक आले एकत्र
Jhund Making: ‘झुंड’ची पडद्यामागची गोष्ट; पहा मेकिंगचा हा खास व्हिडीओ