रितेश-जिनिलीया यांच्या प्रेमाचं चाहत्यांना ‘वेड’; सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला

| Updated on: Jan 02, 2023 | 4:19 PM

वर्षाच्या सुरुवातील रितेश-जिनिलीया यांना मिळतंय चाहत्यांचं भरभरुन प्रेम; पहिल्या आठवड्यात सिनेमाने गोळ केला कोट्यवधींचा गल्ला

रितेश-जिनिलीया यांच्या प्रेमाचं चाहत्यांना वेड; सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला
रितेश-जिनिलीया यांच्या प्रेमाचं चाहत्यांना 'वेड'; सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला
Follow us on

मुंबई : शुक्रवारी सिनेमे रुपेरी पडद्यावर दाखल होतात. पण काही ठराविक सिनेमांना चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळतं. अभिनेता रितेश देखमुख आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख यांच्या ‘वेड’ सिनेमाला देखील प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळत आहे. ‘वेड’ सिनेमाने प्रदर्शनानंतर पहिल्या तीन दिवसांत कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. ३० डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या सिनेमाला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. सध्या सर्वत्र रितेश-जिनिलीया यांच्या मराठी सिनेमाचं कौतुक होत आहे.

पहिल्या तीन दिवसांत सिनेमाने तब्बल १० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. शुक्रवारी सिनेमाने २.२५ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सिनेमाने ३.२५ कोटी रुपयांपर्यंत मजल मारली असून रविवारी सिनेमाने ४.५० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. अशा प्रकारे सिनेमाने पहिल्या तीन दिवसांत जवळपास १० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे.

 

 

‘वेड’ सिनेमातून जिनिलीयाने मराठी सिनेविश्वात पदार्पण केलं आहे, तर दुसरीकडे रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पाय ठेवलं आहे. दोघांच्या पहिल्या प्रयोगाला चाहत्यांनी भरभरून प्रेम देखील दिलं. सध्या सर्वत्र ‘वेड’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. सिनेमाच्या मोठ्या पडद्यापासून ते खऱ्या आयुष्यातील सोबतीपर्यंत अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया डिसूझा यांची जोडी नेहमीच यशस्वी ठरली आहे.

रितेशने याआधी मराठी आणि हिंदी कलाविश्वात मोलाची कामगिरी केली आहे, तर जिनिलीयाने देखील बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण दाक्षिणात्य सिनेविश्वात जिनिलीयाचा बोलबाला आहे. हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये हिट चित्रपट देणारी जिनिलिया ‘वेड’ या चित्रपटातून मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण केलं आहे.

जिनिलिया-रितेशच्या करिअरला सुरुवात!
जिनिलिया-रितेश यांनी २००३ मध्ये एकत्र करिअरला सुरुवात केली. दोघांची भेट ‘तुझे मेरी कसम’ सिनेमाच्या सेटवर झाली. ‘तुझे मेरी कसम’ सिनेमातून दोघांनीही आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यनंतर २०१२ पुन्हा दोघे ‘तेरे नाल लव हो गया’ या चित्रपटात ही जोडी पाहायला मिळाली. त्याच वर्षी जिनिलिया आणि रितेशचे लग्नही झालं.