उत्तर प्रदेश : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्येचा गुंता दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आकांक्षाची आई मधू दुबे यांनी तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी असं म्हटलंय की आकांक्षा अखेरच्या रात्री ज्या पार्टीमध्ये गेली होती, तिथे तिने मद्यपान केलं होतं. मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आकांक्षाच्या पोटातून ना जेवण मिळालं ना द्रव पदार्थ. त्यामुळे आकांक्षाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टशी छेडछाड केल्याचा संशय तिच्या कुटुंबीयांना आहे. कारण त्यांनी आकांक्षाच्या शरीरावर दुखापतीच्या खुणासुद्धा पाहिल्याचा दावा केला आहे.
आकांक्षाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट जाही केला होता, त्यात त्यांनी क्लिन चिट दिली होती. यात कोणतीही संशयास्पद बाब आढळली नसून तिने आत्महत्याच केली, असं डॉक्टरांनी म्हटलं होतं. मात्र आकांक्षाच्या कुटुंबीयांनी आणि तिच्या वकिलांनी या रिपोर्टवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
“आकांक्षाच्या पोटातून जेवण किंवा द्रव पदार्थ मिळाले नाही. मात्र तिच्या पोटात तपकिरी रंगाचा पदार्थ आढळला होता. त्याबद्दल काहीच का सांगितलं गेलं नाही? या 20 एमएल पदार्थाच्या बाबतीत काहीच का बोललं जात नाहीये?”, असा सवाल वकील शशांक शेखर त्रिपाठी यांनी केला.
आकांक्षा भोजपुरी गायक समर सिंहला डेट करत होती. मात्र आत्महत्येच्या काही दिवस आधी या दोघांचं ब्रेकअप झालं होतं. ब्रेकअपमुळे ती नैराश्याचा सामना करत होती, असं पोलीस म्हणाले होते. मधू दुबे यांनी समर सिंह आणि त्यांचा भाऊ संजय सिंहविरोधात एफआयआर दाखल केली होती. मात्र या दोघांना अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी आकांक्षाच्या कुटुंबीयांकडून होत आहे.
आकांक्षा दुबे तीन वर्षांची असतानाच आईवडिलांसोबत मुंबईत राहायला आली होती. तिने आयपीएस अधिकारी व्हावं अशी तिच्या पालकांची इच्छा होती. मात्र आकांक्षाला लहानपणापासूनच डान्स आणि अभिनयात रस होता. आकांक्षाचा जन्म 21 ऑक्टोबर 1997 रोजी उत्तरप्रदेशमधल्या मिर्झापूरमध्ये झाला. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तर आकांक्षाचे टिकटॉक व्हिडीओसुद्धा तुफान व्हायरल झाले होते. भोजपुरी इंडस्ट्रीची ड्रीम गर्ल या नावाने ती ओळखली जायची.
मेरी जंग मेरा फैसला या चित्रपटातून आकांक्षाने भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने ‘मुझसे शादी करोगी’ (भोजपुरी), वीरों के वीर, फायटर किंग, कसम पैदा करने की 2 यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.