BTS Band Jin Join Military: दक्षिण कोरियातील प्रसिद्ध गायक आणि बीटीएस या लोकप्रिय बँडचा सदस्य जिन हा देशसेवेसाठी सैन्यात रुजू झाला आहे. 13 डिसेंबर रोजी जिन दक्षिण कोरियाच्या सैन्यात दाखल झाला.
दक्षिण कोरियाच्या नियमांनुसार, शारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या 18 ते 28 वर्षीय पुरुषांना सैन्यात दाखल होऊन 18 ते 21 महिने देशाची सेवा करावीच लागते. बीटीएस या बँडच्या सात सदस्यांसाठी ही वयोमर्यादा 30 करण्यात आली होती.
4 डिसेंबर रोजी जिन 30 वर्षांचा झाला. त्यानंतर तो 13 डिसेंबर रोजी सैन्यात रुजू झाला. सुरुवातीला त्याला पाच आठवड्यांचं प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्यानंतर विविध ठिकाणी त्याला सैन्यदलातील जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतील.
जिन हा अत्यंत लोकप्रिय गायक आहे. जगभरात त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतूर असतात. त्यामुळे 18 महिन्यांसाठी तो सैन्यात रुजू होण्यासाठी त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुंबड गर्दी केली होती.
गेल्या काही वर्षांत के-पॉप जगभरात लोकप्रिय होऊ लागलं. याचं सर्वांत मोठं श्रेय बीटीएस या बँडला जातं. या बँडच्या इतर सहा सदस्यांनीही जिनला निरोप दिला.
पुढील काही महिन्यांत इतरही सदस्य एकानंतर एक सैन्यात रुजू होणार आहेत. तुम्ही जगप्रसिद्ध सेलिब्रिटी असलात तरी देशसेवेला प्राधान्य देणं महत्त्वाचं असतं, हीच शिकवण या बँडने दिल्याचं चाहते म्हणाले.
बीटीएस बँडच्या सर्व सदस्यांनी सैन्यातील जबाबदारी पार पडल्यानंतर 2025 मध्ये पुन्हा एकत्र येतील.