तेलुगू सुपरस्टार नागार्जुन यांच्या हैदराबादमधील कन्वेन्शन सेंटरला बुलडोझरने तोडण्यात आलं आहे. शनिवारी 24 ऑगस्ट रोजी हे सेंटल तोडलं गेलं. रंगारेड्डी जिल्ह्यातील शिल्पराममजवळील माधापूरमध्ये हायटेक सिटीजवळ हा कन्वेन्शन हॉल होता. नागार्जुन यांनी तलावाच्या जमिनीवर अनधिकृतरित्या हे सेंटर उभारल्याचा आरोप आहे. हैदराबाद आपत्ती मदत आणि संरक्षण एजन्सीच्या (HYDRAA) टीमने या कन्वेन्शन सेंटरवर बुलडोझर चालवला आहे. याप्रकरणी नागार्जुन यांची प्रतिक्रियासुद्धा समोर आली आहे. या कारवाईवरून राग व्यक्त करत ते म्हणाले, “जर कोर्टाने या सेंटरला तोडण्याचा निर्णय दिला असता तर मी स्वत: ते तोडलं असतं. मला अपेक्षा आहे की अधिकाऱ्यांच्या या चुकीच्या कारवाईविरोधात आम्हाला कोर्टात न्याय मिळेल.”
नागार्जुन यांनी त्यांच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहित या कारवाईविरोधात संताप व्यक्त केला आहे. ‘कोर्ट केसेस आणि स्थगितीचे आदेश घेऊनही बेकायदेशीर पद्धतीने आमच्या कन्वेन्शन सेंटरला तोडलं गेलंय. आम्ही ते अनधिकृतरित्या बांधलं नव्हतं. ही जागा पट्टा भूमी आहे. आम्ही तलावाची एक इंच जमीनसुद्धा त्यासाठी वापरली नाही. या सेंटरशी निगडीत तक्रारींवर आम्हाला स्थगितीचा आदेश मिळाला होता. चुकीच्या सूचनेमुळे या सेंटरला तोडलं गेलंय. सेंटरवर बुलडोझर चालवण्याआधी आम्हाला पूर्वसूचनासुद्धा दिली गेली नाही’, असं त्यांनी लिहिलंय.
थुम्मिडीकुंटा तलावाच्या फुल टँक लेव्हल (FTL) क्षेत्रात कथित अतिक्रमण केल्याबद्दल अधिकाऱ्यांनी या एन कन्वेन्शन सेंटरला नोटीस बजावली होती. हे सेंटर 10 एकरांमध्ये पसरलेलं असून सुमारे 1.12 एकर जमीन तलावाच्या मालकीची आहे. आणखी दोन एकर तलावाच्या बफर झोनमध्ये आहे. “त्यांनी स्पष्ट उल्लंघन केलंय आणि तलावाच्या 3 एकरपेक्षा जास्त जमिनीवर अतिक्रमण केलंय. आज आम्ही तिथलं अतिक्रमण पाडण्यास सुरुवात केली”, अशी प्रतिक्रिया हायड्राचे आयुक्त आयपीएस अधिकारी ए. व्ही. रंगनाथ यांनी दिली.
Pained by the unlawful manner of demolition carried out in respect of N Convention, contrary to existing stay orders and Court cases.
I thought it fit to issue this statement to place on record certain facts for protecting my reputation and to indicate that we have not done any…— Nagarjuna Akkineni (@iamnagarjuna) August 24, 2024
तलाव, पाणवडे आणि इतर जागा अतिक्रमणापासून संरक्षित करण्यासाठी गेल्या महिन्यात एजन्सी स्थापन केल्यानंतर HYDRAA चं हे दुसरं मोठं ऑपरेशन आहे. गेल्या आठवड्यात हैदराबादच्या बाहेरील शिवरामपल्ली इथल्या तलावाच्या बफर झोनमध्ये आलेले अनेक बंगले, भोजनालये आणि इमारतींवर तोडक कारवाई करण्यात आली होती. नागार्जुन यांच्या या कन्वेन्शन सेंटरमध्ये तीन हॉल होते. याठिकाणी अनेक मोठमोठ्या पार्ट्यासुद्धा झाल्या आहेत. गेल्या वर्षी प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेता वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी यांच्या लग्नाचं रिसेप्शनसुद्धा याठिकाणी पार पडलं होतं.
64 वर्षीय नागार्जुन यांची एकूण संपत्ती तब्बल 950 कोटींच्या घरात असल्याचं म्हटलं जातं. त्यांनी आजवरच्या करिअरमध्ये 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. तेलुगूसह त्यांनी काही हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. नागार्जुन यांनी 1986 मध्ये ‘विक्रम’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलंय. तर बॉलिवूडमध्ये त्यांनी ‘शिवा’ या चित्रपटातून पहिलं पाऊल ठेवलं होतं.