मुंबई | 12 ऑगस्ट 2023 : ‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा..’ हा जोशपूर्ण डायलॉग ऐकला की सर्वांत आधी तारा सिंग आणि सकिनाचं नाव समोर येतं. ‘गदर : एक प्रेम कथा’मध्ये दाखवण्यात आलेली तारा सिंग आणि सकिनाची क्रॉस बॉर्डर प्रेमकहाणी आजही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. तब्बल 22 वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल ‘गदर 2’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सनी देओल आणि अमीषा पटेल पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. मात्र तुम्हाला माहीत आहे का, ‘गदर’ती कथा काल्पनिक नाही तर खऱ्या आयुष्यावर आधारित आहे. ब्रिटीश सैन्यात काम केलेल्या एका शीख सैनिकाच्या आयुष्यावर ही कथा आधारित आहे.
पंजाबच्या जलंधरमध्ये जन्मलेले बूटा सिंग हे ब्रिटिश सैन्यात कार्यरत होते. त्यांनी दुसऱ्या महायुद्धात लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या नेतृत्वाखाली बर्मा आघाडीवर कर्तव्य बजावलं होतं. बूटा सिंग यांची प्रेमकहाणी केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानातही लोकप्रिय आहे.
भारताच्या फाळणीदरम्यान झालेल्या जातीय हिंसाचारात बूटा सिंग यांनी झैनब नावाच्या एका पाकिस्तानी तरुणीला वाचवलं होतं. नंतर ते त्याच तरुणीच्या प्रेमात पडले. या दोघांना तन्वीर आणि दिलवील अशा दोन मुली होत्या. मात्र बूटा सिंग आणि झैनब यांच्या प्रेमकहाणीचा अंत दु:खद झाला. फाळणीनंतर दहा वर्षांनी भारत आणि पाकिस्तानने त्यांच्या कुटुंबापासून विभक्त झालेल्या महिलांना परत पाठवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा झैनबला मोठ्या मुलीसह पाकिस्तानातील नूरपूर या छोट्या गावात परत पाठवण्यात आलं होतं, जिथे तिचे कुटुंबीय राहत होते. मुलगी आणि पत्नी आपल्यापासून दूर गेल्याने बूटा सिंग हताश झाले होते. त्यांनी त्यांच्या प्रेमाला परत आणण्यासाठी दिल्लीला जाऊन अधिकाऱ्यांनी विनंती केली. पण कोणीच त्यांची मदत केली नाही.
पत्नी आणि मुलीला पाकिस्तानातून परत आणण्यासाठी कोणताच मार्ग नसल्याने अखेर बूटा सिंग यांने इस्लाम धर्म स्वीकारला. इस्लाम स्वीकारून पाकिस्तानात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा झैनबच्या कुटुंबीयांनी त्यांना स्वीकारलं नाही. उलट बूटा सिंग यांना बेदम मारहाण करून त्यांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलं होतं. झैनबवरही तिच्या कुटुंबीयांचा दबाव होता. त्यांनी कोर्टात बूटा सिंग यांच्यासोबत परत जाण्यास नकार दिला.
पत्नी आणि मुलीपासून दुरावलेल्या बूटा सिंगने 1957 मध्ये पाकिस्तानातील शाहदरा स्टेशनजवळ आपल्या मुलीसह ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. या अपघातात त्यांची मुलगी बचावली होती. आत्महत्येपूर्वी बूटा सिंग यांनी पत्र लिहिलं होतं. फाळणीनंतर झैनब आणि तिचे आई-वडील ज्याठिकाणी स्थायिक झाले होते, त्या बरकी गावात दफन करण्याची त्यांची शेवटची इच्छा होती. लाहौरमध्ये शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह गावी नेण्यात आला. मात्र गावकऱ्यांनी त्यांच्या पार्थिवाला मैनी साहिब स्मशानभूमीत दफन करण्यास नकार दिला.
बूटा सिंग आणि झैनब यांची प्रेमकथा अनेक पुस्तकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये रुपांतरित करण्यात आली. केवळ गदरच नाही तर 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या पंजाबी चित्रपटात त्यांची प्रेमकहाणी दाखवण्यात आली होती. यामध्ये गुरदास मान आणि दिव्या दत्ता यांनी भूमिका साकारल्या होत्या. शाहरुख खान आणि प्रिती झिंटा यांचा वीर झारा या चित्रपटाच्या कथेसाठीसुद्धा बूटा सिंग यांच्या कथेतून प्रेरणा घेण्यात आली होती.