मुंबई | 19 सप्टेंबर 2023 : फोटोत दिसणाऱ्या या अभिनेत्रीला ओळखलंत का? आपल्या अदाकारी आणि कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांची मनं जिंकणारी ही अभिनेत्री चित्रपटसृष्टीत काम करण्याआधी सायकलिंग आणि स्विमिंगमध्ये नॅशनल चॅम्पियन होती. हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याआधी ही अभिनेत्री क्रीडा विश्वात खूप सक्रीय होती. या अभिनेत्रीने तिच्या करिअरमधील सर्वाधिक चित्रपट हे प्रसिद्ध अभिनेते महमदू यांच्यासोबत केले आहेत. या दोघांची जोडी पडद्यावर खूप हिट होती. या ब्लॅक अँड व्हाइट फोटोमध्ये दिसणाऱ्या सुंदर अभिनेत्रीला तुम्ही ओळखू शकलात का? या बॉलिवूड अभिनेत्रीने राष्ट्रीय स्तरावर क्रीडा विश्वात नाव कमावल्यानंतर अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं.
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून शुभा खोटे आहेत. त्यांच्या कॉमिक टायमिंगचं आजही खूप कौतुक होतं. शुभा यांचा जन्म 30 ऑगस्ट 1936 रोजी मुंबईतील गिरगावमध्ये झाला. चित्रपटांमध्ये काम करण्याआधी त्या स्पोर्ट्समध्ये खूप सक्रीय होत्या. याच स्पोर्टी लूकमुळे त्यांना चित्रपटाची ऑफर मिळाली होती. क्रीडा विश्वातील कामगिरीमुळे अनेकदा वृत्तपत्रात त्यांचे फोटो छापून यायचे. वृत्तपत्रातील फोटो पाहूनच दिग्दर्शक अमिय चक्रवर्ती यांनी शुभा यांना चित्रपटाची ऑफर दिली होती. चक्रवर्ती यांनी त्यांचे डिस्ट्रीब्युटर कामथ साहेबांना शुभा यांच्याकडे चित्रपटाची ऑफर घेऊन पाठवलं होतं.
जेव्हा कामथ शुभा यांच्याकडे पोहोचले, तेव्हा त्यांचा टॉमबॉय लूक होता. हा लूक पाहून कामथ पुन्हा माघारी आले. अशा टॉमबॉय लूकमधील मुलगी अभिनेत्री कशी बनू शकते, असा प्रश्न त्यांना पडला होता. मात्र अमिय हे त्यांच्या निर्णयावर ठाम होते आणि त्यांनी स्वत: जाऊन शुभा यांची भेट घेतली. अमिय यांनी त्यांच्या ‘सीमा’ या चित्रपटासाठी शुभा यांची निवड केली होती. या पहिल्यावहिल्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शुभा यांच्या चेहऱ्यावर मार लागला होता. सायकलवरून एका चोराचा पाठलाग करण्याचा हा सीन होता. या सीनच्या शूटिंगदरम्यान शुभा यांना दुखापत झाली होती. त्यातून बरं होण्यास त्यांना जवळपास 45 दिवस लागले होते.
शुभा यांनी लग्नाआधी आणि लग्नानंतरही हिट चित्रपटे दिली. लग्नानंतरच्या चित्रपटांमध्ये ‘गोलमाल’, ‘नसीब’, ‘कुली’, ‘हम दोनों’, ‘सागर’, ‘खून भरी मांग’, ‘दिल है कि मानता नहीं’, ‘सौदागर’, ‘जुनून’, ‘अनाड़ी’, ‘वक्त हमारा है’, ‘कोयला’, ‘सिर्फ तुम’, ‘शरारत’, ‘टॉयलेट एक प्रेम कथा आणि ‘डबल एक्सएल’ या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय त्यांनी काही मालिकांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. यामध्ये ‘जुनून’, ‘जबान संभाल के’, ‘एक राजा एक रानी’, ‘अंदाज’, ‘दम दमा दम’, ‘बा बहु और बेबी’ यांचा समावेश आहे.