एक अशी अभिनेत्री जी खूप सुंदरही असेल आणि दमदार अभिनयसुद्धा करत असेल, तर यापेक्षा अधिक बॉलिवूड इंडस्ट्रीला आणखी काय हवं? मात्र इंडस्ट्रीत अशी एक अभिनेत्री आहे, जिच्यासाठी तिची सुंदरताच शाप बनला आहे. अतिसुंदर दिसण्यामुळे तिला बॉलिवूडमध्ये फारशा चांगल्या भूमिका मिळाल्या नाहीत. त्यामुळे ‘सुंदरता हीच माझी ट्रॅजेडी’ आहे असं ती मानते. फोटोत दिसणारी ही चिमुकली आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मात्र सुंदरतेमुळे अपेक्षित असं काम मिळालं नसल्याची खंत ती व्यक्त करते. फोटोत दिसणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव आहे दिया मिर्झा. दियाचे वडील जर्मन असून तिची आहे बंगाली हिंदू आहे.
दिया मिर्झाच्या सौंदर्याचं वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतील. तिला पाहून असंख्य चाहते घायाळ होतात. आपल्या सौंदर्यामुळे आणि अभिनयकौशल्यामुळे दिया मिर्झालाही असं वाटलं होतं की तिला पाहिजे ती भूमिका मिळू शकेल. मात्र अनेक निर्मात्यांनी तिला हे सांगून नाकारलं की ती खूप जास्त सुंदर आहे. एका मुलाखतीत खुद्द दियानेच याचा खुलासा केला होता. “टू मच मेनस्ट्रीम लूक” असं म्हणत दिग्दर्शकाने नकार दिल्याचं दियाने सांगितलं होतं. दियाला चौकटीबाहेर जाऊन विविध विषयांवर आधारित चित्रपटांत काम करायचं होतं. मात्र अतिसुंदरतेमुळे दिग्दर्शकांनी तिला नकार दिला होता.
दिया मिर्झाची आई बंगाली हिंदू असून तिचे वडील जर्मनीचे आहेत. तिच्या वडिलांचं नाव फ्रँक हेडरीच असं आहे. असं असूनही दिया तिचं आडनाव मिर्झा असं लावते. या मुस्लिम आडनावामागे एक खास कारण आहे. जेव्हा दिया चार वर्षांची होती, तेव्हाच तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. तेव्हा तिच्या आईने हैदराबादच्या अहमद मिर्झाशी दुसरं लग्न केलं होतं. अहमद मिर्झा यांनी दियाला कधीच वडिलांची कमतरता भासू दिली नाही. म्हणूनच दियाने तिच्या नावापुढे त्यांचं आडनाव लावण्यास पसंती दिली.
दियाने 2000 मध्ये ‘फेमिना मिस इंडिया एशिया पॅसिफिक’चा किताब जिंकला होता. त्यानंतर ती ‘मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल’सुद्धा ठरली होती. 2001 मध्ये तिने ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने ‘दस’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘हनिमून ट्रॅव्हल्स प्रा. लि.’, ‘संजू’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.