मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीत अशा फार कमी अभिनेत्री होत्या, ज्या शास्त्रीय नृत्यात पारंगत असण्यासोबतच अभिनयातही दमदार होत्या. या दोन्ही कलांसोबतच त्यांना सौंदर्याचीही देणगी प्राप्त झाली होती. बॉलिवूडच्या अशाच दिग्गज अभिनेत्रींमध्ये या चिमुकल्या मुलीचाही समावेश आहे. फोटोत दिसणारी ही मुलगी नक्की आहे तरी कोण, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ही अभिनेत्री एकेकाळी फक्त बॉलिवूडमध्येच लोकप्रिय नव्हती तर टॉलिवूडमध्येही तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. लहानपणापासूनच ती शास्त्रीय नृत्यात कुशल होती. असं म्हटलं जातं, जेव्हा ती शाळेत डान्स परफॉर्म करायची तेव्हा तिला प्रेक्षक पाहतच राहायचे. तिच्या नृत्यकौशल्याला पाहूनच एका दिग्दर्शकाने थेट चित्रपटाची ऑफर दिली होती.
फोटोत गोड हसणारी ही मुलगी दुसरी-तिसरी कोणी नसून अभिनेत्री जया प्रदा आहेत. जया प्रदा या लहानपासूनच शास्त्रीय नृत्यात पारंगत होत्या. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षीच त्यांना पहिल्या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. या चित्रपटाचं नाव होतं भूमी कोशम. हा तेलुगू चित्रपट होता आणि त्यातील भूमिकेसाठी जया प्रदा यांना फक्त 10 रुपये मानधन मिळालं होतं. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर जया यांनी बॉलिवूडकडे मोर्चा वळविला. हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी दमदार अभिनय आणि नृत्यकौशल्याच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख बनवली. अवघ्या काही काळातच त्या यशाच्या शिखरावर पोहोचल्या होत्या. एकेकाळी 10 रुपयांचं मानधन घेणाऱ्या जया प्रदा बॉलिवूडमध्ये सर्वाधिक फी घेणाऱ्या अभिनेत्री ठरल्या होत्या.
1985 पर्यंत त्या आपल्या करिअरच्या शिखरावर पोहोचल्या होत्या. सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रीच्या छवीमुळे त्यांना नुकसानही सोसावं लागलं होतं. त्यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला होता. त्यामुळे जया प्रदा खूप चिंतेत होत्या आणि त्याचा परिणाम त्यांच्या करिअरवरही झाला. तेव्हा निर्माते श्रीकांत नाहटा यांनी त्यांची खूप साथ दिली. ही साथ देतानाच दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न केलं. मात्र आधीच तीन मुलांचा पिता असलेले श्रीकांत नाहटा हे त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊ शकले नव्हते.
श्रीकांत यांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या जया प्रदा यांनी तरीही त्यांच्याशी लग्न केलं. मात्र नेहमीच त्यांना दुसऱ्या बायकोचा ठपक सहन करावा लागला. आपण आई व्हावं, अशी त्यांची खूप इच्छा होती. मात्र त्यांची ही इच्छासुद्धा पूर्ण होऊ शकली नव्हती. अखेर त्यांनी त्यांच्या बहिणीच्या बाळाला दत्तक घेऊन आई होण्याची इच्छा पूर्ण केली.