‘भिडू’ म्हटलं की डोळ्यांसमोर अभिनेता जॅकी श्रॉफचा चेहरा येतो. बॉलिवूड इंडस्ट्रीत आणि चाहत्यांमध्ये जॅकी त्याच्या अनोख्या बोलण्याच्या स्टाइलमुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावरही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. जॅकीची चालण्या-बोलण्याची पद्धत, त्याचे हावभाव, आवाजातील चढउतार हे सर्व इतर अभिनेत्यांपेक्षा पूर्णपणे वेगळं आणि अनोखं आहे. मात्र त्याच्या याच गोष्टींची नक्कल त्याच्या परवानगीशिवाय केली जात असल्याने जॅकीने नाराजी व्यक्त केली आहे. याविरोधात थेट त्याने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. आपलं नाव, पसंत आणि भिडू या शब्दाच्या वापराविरोधात जॅकीने कोर्टात याचिका दाखल केली आहे.
14 मे रोजी दाखल केलेल्या या याचिकेत जॅकीने मागणी केली आहे की, जर त्याचं नाव, फोटो, आवाज आणि भिडू शब्दाला वापर परवानगीशिवाय केल्यास त्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जावी आणि दोन कोटी रुपयांचा दंड ठोठवावा. या याचिकेवरून हायकोर्टाने सध्या सर्व आरोपींविरोधात समन्स बजावले आहेत. त्याचप्रमाणे MEITY ला (डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी आणि मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) कोर्टाने निर्देश दिले आहेत की त्यांनी असे सर्व लिंक्स सोशल मीडियावरून काढून टाकावेत, जिथे जॅकी श्रॉफच्या खासगी हक्कांचं उल्लंघन केलं असेल.
जॅकीचे वडील प्रवीण आनंद यांनी कोर्टात सांगितलं की असं करून अभिनेत्याची प्रतिमा मलिन केली जात आहे. आक्षेपार्ह मीम्समध्ये जॅकीच्या नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातोय. त्याचसोबत त्यांच्या आवाजाचाही गैरवापर केला जातोय. म्हणूनच जॅकीने हायकोर्टात त्याविरोधात याचिका दाखल केली आहे आणि आपल्या अधिकारांच्या सुरक्षेची मागणी केली आहे. जॅकी, जग्गू दादा आणि भिडू हे शब्द कोणत्याही प्लॅटफॉर्मवर वापर करण्यापासून रोखलं जावं, असंही त्यांनी म्हटलंय. या प्रकरणाची सुनावणी 15 मे रोजी होणार आहे.
प्रत्येक अभिनेत्याचं एक खास व्यक्तीमत्त्व असतं. अनेकदा विनोदांमध्ये, मीम्समध्ये त्यांचा वापर करून खिल्ली उडवली जाते. सोशल मीडियावर आपल्या व्यक्तीमत्त्वाचा चुकीचा उपयोग होत असल्याचं पाहून याआधी इतरही कलाकारांनी त्यावर आक्षेप नोंदवला आहे. याआधी अनिल कपूर यांनीही हे पाऊल उचललं होतं. पण यापुढे कृष्णा अभिषेकसारखे कॉमेडियन्स काय करणार, असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. कृष्णाला विविध कार्यक्रमांमध्ये जॅकी श्रॉफची नक्कल केल्याचं पाहिलं गेलंय.