बॉलिवूड अभिनेत श्रेयस तळपदे कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. अभिनेत्याला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. उत्तर प्रदेश याठिकाणी श्रेयस आणि त्याच्यासह आणखी 14 लोकांविरोधात फसवणुकीसारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हे आरोप कोट्यवधी रुपयांच्या चिटफंड घोटाळ्याशी संबंधित आहेत जो महोबा जिल्ह्यात एक दशकाहून अधिक काळ सुरू होता.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस तळपदे आणि इतर आरोपी लोणी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट अँड थ्रिफ्ट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नावाच्या कंपनीशी कथितपणे जोडलं गेलं होते, ज्यांनी गुंतवणुकीवर उच्च परतावा देण्याचं आश्वासन देऊन गावकऱ्यांना लक्ष्य केले. एवढंच नाही तर, अल्पावधीतच त्यांची गुंतवणूक दुप्पट होईल, असं आमिष दाखवून कंपनीच्या एजन्ट व्यक्तींनी स्थानिक लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचं सांगितलं जातं आहे.
जेव्हा या योजनेवर कायदेशीर प्रश्न निर्माण होऊ लागले तेव्हा एजंट त्यांचं काम बंद करून जिल्ह्यातून गायब झाल्याचं देखील सांगण्यात आलं. आता महोबा येथील श्रीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ नाही जेव्हा अभिनेता श्रेयस तळपदे याचं नाव फसवणुकीच्या प्रकरणात समोर आलं आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, फेब्रुवारीमध्ये, लखनऊमध्ये गुंतवणुकदारांची 9 कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल त्याच्या आणि ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला होता.
गोमतीनगर पोलिस ठाण्यात या तक्रारीची नोंद करण्यात आली आहे. याआधी, हरियाणातील सोनीपत येथील मल्टी-लेव्हल मार्केटिंग फसवणूक प्रकरणात दोन्ही अभिनेत्यांची नावे समोर आली होती. ज्यामध्ये श्रेयसच्या नावाचाही समावेश होता. श्रेयसने त्याच्यावरील आरोपांबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.
श्रेयस याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘वेलकम टू द जंगल’ सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात अक्षय कुमार, संजय दत्त, रवीना टंडन, अरशद वारसी, परेश रावल यांसारखे अन्य कलाकार देखील दिसणार आहेत. तर अभिनेता ‘हाऊसफुल 5’ सिनेमात देखील दिसणार आहे. अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन देखील मुख्य भुमिकेत दिसणार आहे.