मुंबई : अभिनेत्री जिया खान आत्महत्येप्रकरणी तब्बल 10 वर्षांनंतर अभिनेता सूरज पांचोलीची निर्दोष सुटका झाली. जियाच्या आत्महत्येला सूरजला जबाबदार धरता येणार नाही, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. जिया खानने 3 जून 2013 रोजी मुंबईतल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. जियाच्या घरी सहा पानी सूसाइड नोट मिळाली होती. सूरज पांचोलीने तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं, असं त्या सूसाइड नोटमध्ये लिहिण्यात आलं होतं. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सूरजला अटक केली होती. ज्या सुसाइड नोटच्या आधारावर सूरजला अटक झाली होती, त्याच्याशी संबंधित आता मोठी अपडेट समोर आली आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सूरजने सांगितलं की जियाच्या आत्महत्येनंतर जी सूसाइड नोट मिळाली, ती बनावट होती. “आता 10 वर्षांनंतर सुनावणीदरम्यान सुसाइड नोटला चुकीचं म्हटलं गेलंय. तर मग त्यावेळी मला का अटक झाली होती. हे संपूर्ण प्रकरण म्हणजे केवळ मीडिया ट्रायल होतं. ती ट्रायल कोर्टात नव्हे तर कोर्टाबाहेर सुरू होती”, असं सूरज म्हणाला. त्याचप्रमाणे याप्रकरणी मुंबई पोलीस, अधिकारी किंवा जिया खानच्या आईच्या विरोधात जाणार नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं. “मला कोणाच्याही विरोधात जायचं नाही, कारण मला माझ्या आयुष्यात पुढे जायचंय. जर मी माझा सूट घेण्यावर ठाम राहिलो तर ते माझ्या कोणत्याच कामी येणार नाही”, असं सूरजने सांगितलं.
एका मुलाखतीत सूरजने सांगितलं होतं की सीबीआय कोर्टाने जियाच्या घरी सापडलेला सुसाइड नोट हा बनावट ठरवलंय. “जी सहा पानी सुसाइड नोट होती, ती खोटी होती. ज्या नोटबुकमध्ये ती लिहिली होती, ती जियाच्या आईची होती. इतकंच नव्हे तर ते हस्ताक्षरसुद्धा जियाच्या आईचं होतं”, असं सूरज म्हणाला होता.
‘आरोपीवर करण्यात आलेले आरोप सिद्ध करण्यात तपास यंत्रणेला पूर्णपणे अपयश आलं. तपास यंत्रणा आरोपीविरोधात ठोस पुरावे सादर करू शकली नाही. इतकंच नव्हे तर आरोपीविरोधातील पुरावे अस्पष्ट आहेत. या पुराव्यांवरून सूरजने जियाला गर्भपात करण्यास भाग पाडल्याचं तसंच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं दिसून येत नाही. त्यामुळेच त्याला जियाच्या आत्महत्येसाठी जबाबदार ठरवता येणार नाही’, असं कोर्टाने स्पष्ट केलं.
जिया आनंदी मुलगी होती, त्यामुळे ती कधीही आत्महत्या करू शकत नाही, असं दाखवण्याचा प्रयत्न तिची आई राबियाने केला. परंतु साक्षीपुराव्यांमधून वेगळं चित्र समोर येत होतं, असंही न्यायालयाने नमूद केलं.