मुंबई | 20 जुलै 2023 : अभिनेत्री सेलिनी जेटलीची सोशल मीडियावरील पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये सेलिनाने तिच्या आयुष्यातील अत्यंत दु:खद घटनेविषयी सांगितलं आहे. सेलिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा दिवंगत मुलगा शमशेरचा फोटो पोस्ट केला आहे. प्रेग्नंसीच्या 32 व्या आठवड्यात सेलिनाला प्रसववेदना होऊ लागल्या होत्या आणि हृदयाशी संबंधित समस्येमुळे तिने बाळाला गमावलं होतं. या घटनेच्या पाच वर्षांनंतर त्याविषयी मोकळेपणे व्यक्त होण्याचं धाडस केल्याचं ती म्हणाली. मुलाचा फोटो पोस्ट करत तिने भलीमोठी भावूक पोस्ट लिहिली आहे.
‘आमच्या जीवनातील या दु:खातून बाहेर पडण्यासाठी मला पाच वर्षे लागली. मात्र आता माझ्यासारख्याच इतर आई-वडिलांची मदत करण्यासाठी मी माझा अनुभव सांगण्याचं धाडस करतेय. अशा अनेक आईवडिलांनी माझी आणि पीटर हागची (पती) भेट घेतली कारण तेसुद्धा त्यांचं बाळ गमावण्याच्या दु:खाला सामोरं गेले होते. त्यातून तुम्ही कसं बाहेर पडू शकता हे मी त्यांना सांगू इच्छिते’, असं तिने लिहिलं आहे.
या पोस्टमध्ये सेलिना पुढे लिहिते, ‘पीटर आणि मला असं वाटतं की अशा पालकांनी हे जाणून घ्यावं की ते यातून ते मार्ग काढू शकतात. प्रीमॅच्युअर बाळ आपल्याला विश्वास, प्रार्थनेची शक्ती आणि मानवी आत्म्याची खरी लढाई दाखवतात. हे लक्षात ठेवा की बहुतांश प्रीमॅच्युअर बाळ पूर्णपणे सामान्य आणि निरोगी जीवन जगतात. NICU मध्ये विचित्र आणि कठीण वातावरण होतं. आमच्या अनुभवावरून मी हे सांगू शकते की चांगले दिवस येतील आणि वाईटही दिवस येतील हे स्वीकारलं की तुम्हाला अशा आव्हानात्मक दिवसांत कमीत कमी धक्का बसतो. प्रत्येकासाठी हे शक्य नसतं, पण मी आणि पीटर काही महिन्यांसाठी दुबईतील एकाच रुग्णालयात राहिलो. शमशेरला गमावल्यानंतर आम्हाला आर्थरबद्दल खूप चिंता वाटली. निराशा, अतीव दु:ख, अपराधीपणा, राग, प्रेम या सर्व भावना एकाच वेळी आमच्या मनात उसळून आल्या होत्या.’
‘ही गोष्ट तुम्ही जाणून घ्या की टोकाच्या किंवा कधी कधी विरोधाभासी वाटणाऱ्या भावना प्रत्येक पालकाने त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी अनुभवलेल्या असतात. अशा परिस्थितीत तुम्ही एक टीम म्हणून काम करणं खूप गरजेचं असतं. NICU मध्ये तुमच्या प्रीमॅच्युअर बाळाजवळ हळूवारपणे गाणं किंवा बोलणं हा अनुभव एक उत्तम मार्ग आहे. जरी तुम्ही त्याला स्पर्श करू शकत नसलात तरी तुम्ही त्याच्याशी जोडून राहाल. लक्षात ठेवा की अशक्य वाटणाऱ्या गोष्टीच अविश्वसनीय चमत्कार घडवून आणू शकतात’, अशा शब्दांत तिने तमाम अशा पालकांना आधार दिला, ज्यांनी सेलिनासारख्याच दु:खाचा सामना केला आहे.
सेलिनाने 2011 मध्ये ऑस्ट्रियाई हॉटेल बिझनेसमॅन पीटर हागशी लग्न केलं. त्यानंतर 2012 मध्ये तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. 2017 मध्ये सेलिना पुन्हा गरोदर होती. यावेळीही तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र त्यापैकी एका बाळाचा हृदयाशी संबंधित समस्यांमुळे निधन झालं.