मुंबई | 30 सप्टेंबर 2023 : प्रसिद्ध तमिळ अभिनेता आणि निर्माता विशाल याने सेन्सॉर बोर्डावर भ्रष्टाचाराचा धक्कादायक आरोप केला. या आरोपांतर चित्रपटसृष्टीत चांगलीच खळबळ उडाली. मार्क अँटनी या चित्रपटाला सर्टिफिकेट देण्याच्या बदल्यात साडेसहा लाख रुपये लाच मागितल्याचा आरोप विशालने केला होता. सोशल मीडियावर त्याने याबद्दलचा व्हिडिओ पोस्ट करत पुरावेही दिले होते. इतकंच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्याने मदत मागितली होती. या प्रकरणाची गंभीर दखल माहिती व प्रसारण मंत्रालयानेही घेतली. त्यानंतर आता सेन्सॉर बोर्डाकडून त्याविषयी प्रतिक्रिया देण्यात आली आहे. सेन्सॉर बोर्डाने एक निवेदन जारी केलं असून त्यात भ्रष्टाचार सहन करणार नसल्याचा स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे भ्रष्टाचाराची ही समस्या दूर करण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलणार असल्याचंही बोर्डाने नमूद केलं.
सेन्सॉर बोर्डाने त्यांच्या निवेदनात म्हटलंय, “आम्हाला असं लक्षात आलं आहे की ऑनलाईन प्रमाणन प्रणाली म्हणजेच ई-सिनेप्रमाणन सुविधा उपलब्ध असतानाही, चित्रपट निर्माते किंवा अर्जदारांसाठी नवीन प्रणालीतील सुधारणांविषयी नियमित अपडेट्स देण्यात आले असूनही मध्यस्थ व्यक्ती किंवा एजंटद्वारे अनेकजण अर्ज भरण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेतील तृतीय पक्षाचा सहभाग काढून टाकण्याच्या आमच्या उद्दिष्टात अडथळा निर्माण होतो. सेन्सॉर बोर्डावर केलेल्या आरोपांकडे आम्ही अत्यंत गांभीर्याने पाहत आहोत. सेन्सॉर बोर्डातील भ्रष्टाचार अजिबात सहन केला जाणार नाही. तसंच त्यात कोणीही सामील झाल्याचं आढळल्यास त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जातील. आम्ही या घटनेच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. दरम्यान सेन्सॉर बोर्डाची प्रतिमा मलिन करण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही.”
“मुंबईतल्या सेन्सर बोर्डाच्या ऑफिसमध्ये जे घडलं ते पाहून आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला. माझ्या टीममधल्या एका व्यक्तीला मी सेन्सॉर बोर्डाच्या ऑफिसमध्ये प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पाठवलं होतं. त्याच दिवशी सर्टिफिकेट हवा असेल तर लाखो रुपये मोजावे लागतील असं त्याला म्हटलं गेलं. अखेर आमच्याकडे कोणताच पर्याय नव्हता. ‘मार्क अँटनी’ य चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला सर्टिफिकेट देण्यासाठी सेन्सॉर बोर्डाकडून साडेसहा लाख रुपये लाच मागण्यात आली. या साडेसहा लाखांपैकी तीन लाख रुपये सेन्सॉर बोर्डाच्या ऑफिसमध्ये चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी आणि उर्वरित साडेतीन लाख रुपये सर्टिफिकेटसाठी मागण्यात आले.” असा आरोप विशालने केला होता.