मुंबई : 16 मार्च 2024 | कसे आहात? हसताय ना? असं म्हणत फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकणारा शो म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’. गेल्या दहा वर्षांपासून या कार्यक्रमाने अनेकांना खळखळून हसवलं. प्रेक्षकांच्या मनात घर करून असलेला हा लोकप्रिय कार्यक्रम लवकरच निरोप घेणार आहे. येत्या 17 मार्चपासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाही. याच दिवशी या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. पण त्याचसोबत हा एक अल्पविराम असल्याचं कार्यक्रमाच्या टीमकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या अल्पविरामानंतर हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या लाडक्या टीमसोबत पुन्हा एकदा हसवायला आणि मनोरंजन करायला सज्ज होणार आहे. ‘चला हवा येऊ द्या’च्या शेवटच्या भागात ‘पारू’, ‘शिवा’, ‘पुन्हा कर्तव्य आहे’ आणि ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकांचे प्रमुख कलाकार मंचावर उपस्थित राहणार आहेत. या सर्वांसोबत मंचावर डान्स आणि विनोदाची आतषबाजी होणार आहे.
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाबद्दल बोलताना ‘झी मराठी’ वाहिनीच्या चीफ चॅनल ऑफिसर व्ही. आर. हेमा म्हणाल्या, “चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने मनोरंजनाचा स्तर एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवला आहे. या टीममधल्या प्रत्येकाने लोकांच्या हृदयात आपलं घर निर्माण केलं. वाहिनीसोबत असलेलं यांचं नातं हे अलौकिक आहे. प्रेक्षकांच्या लाफ्टर डोसचा बुस्टर डोस घेऊन ही टीम तुमच्यासाठी नव्या जोमात परत येणार आहे.”
गेल्या काही दिवसांपासून ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम चर्चेत आहे. अभिनेता सागर कारंडेपाठोपाठ डॉ. निलेश साबळे यांनीही कार्यक्रमातून एग्झिट घेतली होती. झी मराठी वाहिनीवरील हा सर्वांत लोकप्रिय आणि सगळ्यांचा आवडता असा कार्यक्रम आहे. भाऊ कदम, सागर कारंडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे आणि डॉ. निलेश साबळे यांच्यासह इतरही काही कलाकारांनी आपल्या कुशल अभिनयाने आणि खुसखुशीत विनोदाने हा कार्यक्रम जगभर पोहोचवला होता.
दोन-तीन महिन्यांपूर्वी कुशल बद्रिके या कार्यक्रमातून बाहेर पडला. त्यावेळी तो हिंदीमध्ये काम करीत असल्याचं कारण सांगण्यात आलं होतं. मात्र नंतर तो कार्यक्रम परतला तेव्हा डॉ. निलेश साबळे कार्यक्रमातून बाहेर पडला. वैयक्तिक कारणामुळे त्याने शो सोडल्याचं म्हटलं गेलं. आता हा कार्यक्रमच प्रेक्षकांचा निरोप घेत असून त्याचा शेवटचा भाग रविवार 17 मार्च रात्री 9.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.