गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांच्या ज्याची प्रतीक्षा होती, अखेर तो ‘पुष्पा 2: द रुल’चा ट्रेलर रविवारी संध्याकाळी एका भव्यदिव्य कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आला. पाटणामधील गांधी मैदानमध्ये ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना हे दोघं मुख्य कलाकार उपस्थित होते. या ट्रेलर लाँच कार्यक्रमात तब्बल 10 हजारांहून अधिक चाहत्यांनी गर्दी केली होती. अल्लू अर्जुन आणि रश्मिकाची एक झलक पाहण्यासाठी गांधी मैदानमध्ये तुंबाड गर्दी झाली होती. काही चाहते बॅरिकेड्स आणि स्टँडवर चढले होते. परिस्थिती नियंत्रणाबाहेर येत असल्याचं लक्षात येताच अखेर पोलिसांनी गर्दीला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला.
‘एएनआय’ या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, कार्यक्रमादरम्यान अनेक चाहते सेलिब्रिटींना पाहण्यासाठी पाटणा इथल्या गांधी मैदानात उभारलेल्या स्टँडवर चढले होते. तिथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने जमावावर नियंत्रण आणण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लाठीचार्ज केला. सोशल मीडियावर या कार्यक्रमातील बरेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यातील काही व्हिडीओंमध्ये पहायला मिळतंय की गर्दीतील चाहते पोलिसांवर चप्पल आणि इतर गोष्टी फेकत आहेत. स्टेजच्या जवळ जाण्यास आणि स्टँडवर चढण्यास मनाई करताच गर्दी नियंत्रणाबाहेर जात असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
#WATCH | Bihar: People climb on structures erected at Gandhi Maidan in Patna to catch a glimpse of Allu Arjun and Rashmika Mandanna at the trailer launch event of ‘Pushpa 2: The Rule’. A massive crowd has gathered here, security deployed at the spot. pic.twitter.com/4P1ofojYt5
— ANI (@ANI) November 17, 2024
काही वेळानंतर परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. “कार्यक्रमात जे लोक बॅरिकेड्स ओलांडून स्टेजच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना तिथून हटवण्यात आलं. गांधी मैदानात पुरेशी सुरक्षाव्यवस्था तैनात आहे”, असं पाटणाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजीव मिश्रा ‘ई टाइम्स’शी बोलताना म्हणाले. पाटणाचे जिल्हा दंडाधिकारी चंद्रशेखर सिंह यांनीसुद्धा पीटीआयशी बोलताना सर्वकाही नियंत्रणात असल्याचं सांगितलं.
‘पुष्पा 2: द रूल’ या चित्रपटाचं दिग्दर्शन सुकुमार यांनी केलं असून 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. पहिल्या भागात अल्लू अर्जुन, फहाद फासिल आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका होत्या. आता सीक्वेलमध्येही त्यांच्याच मुख्य भूमिका आहेत. या सीक्वेलचा बजेट तब्बल 300 कोटी असल्याचं म्हटलं जातंय. चित्रपटाच्या ट्रेलरला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत असून त्याला आतापर्यंत 1 कोटीपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. ‘पुष्पा 2’ येत्या 5 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.