मुंबई : चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण कोरोनाविषयक आरोग्याच्या नियमांची पूर्ण काळजी घेऊन झाले पाहिजे, यात कोणताही निष्काळजीपणा झालेला परवडणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विशेषत: मुंबई आणि परिसरात निर्मात्यांनी चित्रीकरणाचे स्थळ व वेळ याबाबत पोलिसांशी योग्य तो समन्वय ठेवावा आणि आपल्या पथकातील कलाकार व लोकांची नियमित कोरोना तपासणी करावी, लसीकरण होईल हे पाहावे अशा सुचना दिल्या.
चित्रपट निर्मात्यांची सर्वात मोठी संस्था असलेल्या प्रोड्युसर्स गिल्डच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या कोविडविषयक निर्देशांचे पुरेपूर पालन करून चित्रीकरण पार पडले जाईल, अशी ग्वाही दिली.
या बैठकीस हिंदी चित्रपट निर्मात्यांच्या प्रमुख संस्था असलेल्या प्रोड्युसर गिल्डचे रितेश सिधवानी, स्तुती रामचंद्र, मधु भोजवानी, राकेश मेहरा, नितीन आहुजा हे सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे सुबोध भावे, नागराज मंजुळे, रवी जाधव यांनीही बैठकीत सहभागी होऊन सूचना केल्या. आदेश बांदेकर यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले. या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे देखील सहभागी होते.
गेल्या काही महिन्यांपासून हिंदी व मराठी चित्रपट आणि मालिकांचे निर्माते कोरोना काळात नियमांचे पालन करून चित्रीकरण करत आहेत. परंतु, आता चित्रीकरणाच्या वेळेत वाढ करणे गरजेचे आहे. सायंकाळी 4 नंतर देखील चित्रीकरण करण्यास परवानगी मिळाल्यास सर्वतोपरी काळजी घेऊन व नियमांचे पालन करून चित्रीकरण करता येणे शक्य आहे, असे प्रोड्युसर गिल्डचे म्हणणे होते.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, निर्बंध टाकून तुम्हाला अडवणे आम्हालाही आवडत नाही, पण महारष्ट्र आणि केरळसह देशातील इतर काही राज्यांमधून कोरोनाचा संसर्ग अजूनही आहे. संरक्षित अशा बायो बबलची व्यवस्था करूनही काही क्रीडा स्पर्धा आणि कार्यक्रमादरम्यान संसर्ग झालेला दिसतो आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून देखील आपण पूर्णपणे बाहेर आलेलो नसून, जगातील इतर देशांत परत तिसरी लाट उसळल्याचे दिसते, त्यामुळे आपल्याला आरोग्याच्या नियमांची पूर्ण काळजी घेत राहणे आवश्यक आहे.
मुंबई आणि महाराष्ट्रातील चित्रपट निर्मात्यांनी कोरोना संदर्भात आपल्या कलाकार व कर्मचाऱ्यांची विशिष्ट दिवसानंतर कोरोना चाचणी करत राहणे, पथकातील कुणाला ताप जरी आला असेल किंवा काही लक्षणे दिसत असतील तर त्वरित दखल घेणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वांचे दोन्ही डोसेससह लसीकरण असणे गरजेचे आहे.
निर्बंध कायम न ठेवता कोरोना परिस्थितीची पाहणी करून टप्प्याटप्प्याने, सावधपणे, आणि सुरक्षितरित्या ते उठवण्याबाबत राज्य शासन पाउले टाकत आहे. पण यासाठी सर्वांचे मोठे सहकार्य लागणार आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबई पोलिसांनी देखील प्रत्येक निर्मात्यांचे चित्रीकरणाचे वेळापत्रक , चित्रीकरण ठिकाण व वेळा याबाबतची माहिती निर्मात्यांकडून मागवून घ्यावी आणि एखाद्या अधिकाऱ्यावर समन्वयाची जबाबदारी टाकून व्यवस्थित व नियमांची काळजी घेत असल्याची खात्री करून परवानगी द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
यावेळी टास्क फोर्सचे डॉक्टर संजय ओक, डॉ. शशांक जोशी, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास यांनी देखील कोरोना सद्य परिस्थितीबाबत माहिती दिली. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी देखील यावेळी पोलिसांतर्फे नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत असल्याचे सांगितले.
(Chief Minister Uddhav Thackeray’s instructions to Producers Guild for shooting during Corona Pandemic)