‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या एका एपिसोडचा क्लिप व्हायरल झाल्यानंतर कॉमेडियन कपिल शर्मावर बरीच टीका होत आहे. या एपिसोडमध्ये ‘बेबी जॉन’ या चित्रपटाची टीम पोहोचली होती. या चित्रपटाचा दिग्दर्शक अटलीवर कपिलने वर्णभेदी टिप्पणी करत त्याची मस्करी केली होती. यावर अटलीने कपिलले तिथेच सडेतोड उत्तर दिलं होतं. त्यानंतर हा क्लिप व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांकडूनही कपिलबद्दर संताप व्यक्त केला जातोय. आता प्रसिद्ध गायिका चिन्मयी श्रीपदाने याप्रकरणी कपिलवर टीका केली आहे. कपिलचा व्हिडीओ एक्स (ट्विटर) अकाऊंटवर शेअर करत चिन्ययीने त्याला चांगलंच सुनावलं आहे.
‘कॉमेडीच्या नावाखाली ते त्याच्या वर्णावरून अशा पद्धतीचे मूर्खपणाचे आणि वर्णद्वेषी टोमणे मारणं ते कधी थांबवतील की नाही? कपिल शर्मासारख्या प्रभावशाली व्यक्तीने असं काहीतरी बोलणं निराशाजनक आहे आणि दुर्दैवाने हे आश्चर्यकारक नाही’, अशी पोस्ट चिन्मयीने लिहिली आहे. या पोस्टवर अनेक युजर्सनी कपिलवर नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी कपिल शर्माने जाहीर माफी मागावी अशीही मागणी केली आहे.
Will they never stop these crass and racist jibes at his skin color in the name of ‘comedy’?
Someone with the amount of influence and clout like Kapil Sharma saying something like this is disappointing and unfortunately, not surprising. https://t.co/63WjcoqHzA
— Chinmayi Sripaada (@Chinmayi) December 15, 2024
या एपिसोडमध्ये कपिल अटलीला मस्करीत विचारतो, “तू इतका तरुण आणि इतका मोठा दिग्दर्शक-निर्माता आहेस. पण जेव्हा तू सेलिब्रिटींना पहिल्यांदा भेटतोस, तेव्हा ते असं विचारतात का, अटली कुठे आहे?” त्यावर अटली उत्तर देतो, “मला तुझा प्रश्न समजला. मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. मी ए. आर. मुरुगादोस सरांचा खूप आभारी आहे कारण त्यांनी माझ्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यांनी माझी स्क्रिप्ट वाचली, पण मी कसा दिसतो याकडे पाहिलं नाही किंवा मी त्या पात्रतेचा आहे की नाही याकडेही लक्ष दिलं नाही. पण त्यांना माझी कथा आवडली. मला असं वाटतं की जगाने ही गोष्ट पहायला हवी. आपण एखाद्याच्या दिसण्यावरून त्याच्या प्रतिभेचं मूल्यमापन नाही केलं पाहिजे. दिसण्यावरून मतं नाही बनवली तर उत्तम. तुम्ही लोकांच्या मनावरून त्यांच्याबद्दल मत बनवा.”