‘देसी बॉईज’, ‘बाजार’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री चित्रांगदाने (Chitrangda Singh) सोशल मीडियाद्वारे ‘गो एअर’ (Go Air) या एअरलाइनविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. मंगळवारी चित्रांगदाने इन्स्टाग्रामवर विमानातील व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत एअरहोस्टेसच्या वागणुकीबद्दल राग व्यक्त केला. ‘गो फर्स्ट’चे (Go First) एअरहोस्टेस अत्यंत असभ्य असल्याचं तिने त्यात म्हटलंय. विमानात प्रवास करत असताना चित्रांगदाने व्हिडीओ शूट केला. या व्हिडीओमध्ये तिने एका एअरहोस्टेसकडे कॅमेरा फिरवत लिहिलं, ‘फ्लाइट ३९१ गो एअर, मुंबई ते दिल्ली विमानप्रवास करताना अत्यंत वाईट अनुभव आला. गो एअरचे एअरहोस्टेस हे सर्वांत असभ्य आहेत. त्यांना थोडातरी शिष्टाचार शिकवा. या सर्वांनी माझी खूप निराशा केली. एअरइंडिया विमानप्रवासादरम्यान मला आलेल्या वाईट अनुभवाची आठवण यांनी करून दिली.’
इन्स्टाग्रामवरील आणखी एका पोस्टमध्ये चित्रांगदाने नेमकं काय घडलं, याबद्दल सांगितलं. ‘ही घटना माझ्यासोबत घडली नाही. पण माझ्या बाजूला जी व्यक्ती बसली आहे, त्यांना एअरहोस्टेसकडून अत्यंत वाईट वागणूक मिळत आहे. माझ्या बाजूला बसलेली व्यक्ती त्यांच्याशी अत्यंत नम्रपणे आणि संयमाने वागत आहे. तरीसुद्धा एअरहोस्टेस त्यांना अयोग्य वागणूक देत आहेत. इतका अहंकार दाखवणं बरोबर नाही’, असं लिहित तिने एअरलाइनने त्यात टॅग केलं.
काही दिवसांपूर्वीच अभिनेता आर्य बब्बरनेही अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ‘गो फर्स्ट’ फ्लाइटनेच प्रवास करताना त्याचा वैमानिकाशी वाद झाला. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये आर्य हा वैमानिकाशी बोलताना दिसत आहे. आर्यने केलेल्या विनोदामुळे विमानाचा पायलट नाराज झाला आणि वादाला सुरुवात झाली. ‘संवेदनशील वैमानिक, तुम्ही हसलात तर गो एअर तुम्हाला शिक्षा देते’, असा उपरोधिक टोमणा मारत आर्यने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर व्हिडिओ शेअर केला होता.
चित्रांगदाने २००३ मध्ये सुधीर मिश्रा यांच्या ‘हजारों ख्वाहिशें ऐसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील अभिनयासाठी तिला पुरस्कारदेखील मिळाला होता. आतापर्यंत तिने ‘ये साली जिंदगी’, ‘देसी बॉईज’, ‘इनकार’, ‘आय मी और मैं’, ‘बाजार’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. डिसेंबर २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या अभिषेक बच्चनच्या ‘बॉब बिस्वास’ या चित्रपटातदेखील ती झळकली होती.